उंब्रजमधील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीच्या कामाला वेग
रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते शिल्पकारांना पाच लाखांचा धनादेश सुपूर्द

उंब्रज/प्रतिनिधी : –
उंब्रज येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असून, हे कार्य संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून भविष्यातील प्रत्येक पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि विचारांची प्रेरणा मिळणार असल्याचे मत भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केले.
उंब्रज (ता. कराड) येथे शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. या पवित्र कार्यासाठी समाजातील सर्व घटकांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येत मदतीचा हात द्यावा, तसेच हिंदू धर्मासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही रामकृष्ण वेताळ यांनी यावेळी केले.
या पुतळा उभारणीसाठी रामकृष्ण वेताळ यांनी २ लाख २२ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली असून, शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुतळा साकारणाऱ्या शिल्पकारांना ५ लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून किल्ले रायगड राजसदरवरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरीतील प्रसिद्ध मूर्ती साकारणारे शिल्पकार सतिश घार्गे यांना हा धनादेश प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी संतोष बेडके, शरद जाधव, रणजीत कदम, महेश जाधव, अभिजीत जाधव, विनोद जाधव, अमोल कांबळे, तुषार पाटील, कृष्णात जाधव, सूरज जाधव, मधुकर जाधव, वसंतराव पाटील, महेशकुमार जाधव, जयवंत जाधव, शरदराव पाटील, युवराज चव्हाण (कालगाव), संदीप घाडगे, माऊली धुमाळ, संग्राम जमदाडे, अमोल पवार, योगेश आफळे (मसूर), जीवन जाधव, अमित बर्डे, बाळासाहेब पाटणे, पांडुरंग सावंत आदी उपस्थित होते.



