सातारा जिल्हाहोम

वाकुर्डे योजना सोलर फिडरवर आणण्याची विधानसभेत घोषणा

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची मंजुरी; आ.डॉ. अतुल भोसले यांच्या लक्षवेधीला यश

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिणमधील सुमारे २५ गावांतील हजारो शेतकरी व ग्रामस्थांच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फिडरवर आणण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केली. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी लक्षवेधीद्वारे हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंत्र्यांनी सभागृहात ही घोषणा केली.

महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी सकाळच्या सत्रात आ. डॉ. अतुल भोसले यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेच्या महत्वाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेला १९ डिसेंबर १९९८ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर २००४ मध्ये पहिली तर २०२१ मध्ये दुसरी सुधारित मान्यता देण्यात आली. या योजनेवर आतापर्यंत सुमारे १ हजार ३४९ कोटी रुपयांचा खर्च झाला असून, सुमारे २८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

कराड तालुक्यातील सुमारे २५ गावांतील हजारो ग्रामस्थ शेती व पिण्याच्या पाण्यासाठी या योजनेवर अवलंबून आहेत. मात्र, दरवर्षी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वी पाणी सोडण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे आ. भोसले यांनी सभागृहात स्पष्ट केले. या योजनेतील विजेच्या खर्चाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८१-१९ टक्के सूत्र लागू केले असून, वीजबिलातील ८१ टक्के खर्च शासनाकडून; तर १९ टक्के खर्च शेतकऱ्यांकडून भरला जातो. मात्र हा खर्चही अनेक लहान व गरीब शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे आ. भोसले यांनी सांगितले. कराड दक्षिणमधील काही गावांतील शेतकऱ्यांच्या वीजबिलाचा काही हिस्सा यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भरला जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेसाठी एकूण १६.३३ मेगावॅट विजेची आवश्यकता असून, १४ पंपांसाठी मोठ्या प्रमाणावर वीज खर्च होत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सौरऊर्जा धोरणानुसार ही योजना सोलर फिडरवर आणावी, अशी आग्रही मागणी आ. भोसले यांनी केली. योजना सोलरवर आल्यास विजेवरील खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

या लक्षवेधीला उत्तर देताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, राज्यातील वीजपंप सोलरवर आणण्याचे धोरण सरकारने स्वीकारले असल्याचे सांगितले. त्याच अनुषंगाने येत्या काळात वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फिडरवर आणण्याची घोषणा त्यांनी सभागृहात केली. त्यामुळे शेतकऱ्यांवर विजेचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

दरम्यान, या निर्णयाचे स्वागत करताना आ. डॉ. अतुल भोसले यांनी, यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या वीजबिलाचा प्रश्न सुटून त्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. तसेच या निर्णयाबद्दल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व भाजपा-महायुती सरकारचे आभारही त्यांनी मानले.

४१ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा

वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेच्या सध्याच्या लाभक्षेत्रात सुमारे २८ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. याशिवाय शासनाच्या प्रस्तावित शिराळा उपसा जलसिंचन योजनेत १३ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश होणार आहे. त्यामुळे वाकुर्डे योजना सोलर फिडरवर आल्यास कराड व शिराळा तालुक्यातील एकूण सुमारे ४१ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याची माहिती आ. डॉ. भोसले यांनी दिली.

 

Related Articles