कराड उत्तरमधील रस्त्यांसाठी 28.58 कोटी मंजूर – आमदार मनोजदादा घोरपडे

कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील वाहतुकीची सुविधा अधिक सुरळीत व्हावी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कराड कोरेगाव सातारा व खटाव तालुक्यातील विविध रस्त्याच्या कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 28 कोटी 58 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.
कराड कोरेगाव सातारा व खटाव तालुक्यात असणारा कराड उत्तर मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ असून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. ग्रामीण जनतेच्या मागण्या तसेच पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन या निधीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांच्या सुधारणेमुळे पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होणार आहे. त्याचा थेट लाभ स्थानिक व्यावसायिकांना मिळणार आहे. या कामांमुळे
मतदारसंघातील दळणवळण अधिक वेगवान व सुरक्षित होणार असल्याचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले.
बजेटमध्ये कराड तालुक्यातील प्रजिमा 61 वर वाडोली ते करवडी रस्ता 2 कोटी 80 लाख, प्रजिमा 61 वर करवडी ते राज्य मार्ग 154 पर्यंत 2 कोटी 50 लाख,प्रजिमा 158 वर तळबीड ते तासवडे MIDC रस्ता 2 कोटी 70 लाख, प्रतिमा 119 वर जावळवाडी चौक ते वेणेगाव रस्ता 2 कोटी, प्रतिमा 119 वर जावळवाडी फाटा ते जावळवाडी 1 कोटी, प्रतिमा 37 वर नागठाणे ते सासपडे 2 कोटी, रहिमतपूर ते वडूज प्रतिमा 38 वर शेडगे मळा ते तालुका हद्द 4 कोटी, राज्य मार्ग 142 वर तारगाव ते तालुका हद्द 5 कोटी राज्यमार्गे 124 वर राजाचे कुरले ते शामगाव खिंड 3 कोटी, तसेच उंब्रज येथील शासकीय विश्राम ग्रहाचा पहिला मजला बंधण्यासाठी 3 कोटी 58 लाख असा एकूण 28.58कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे.या निधीमुळे मतदारसंघातील रस्त्याच्या कामांना गती मिळून ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. या निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, यांच्यासह आमदार म्हणून दादा घोरपडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कराड उत्तर मधील उंब्रज हे सर्वात मोठे व वेगाने पसरणारे गाव असल्याने या ठिकाणी एक सुसज्ज असे विश्रामगृह व्हावे ही स्थानिकांची अनेक वर्षाची मागणी होती. त्यानुसार गेल्यावर्षी अर्थसंकल्पामध्ये 2 कोटी 25 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला होता. या अर्थसंकल्पामध्ये 3.58 कोटी असा एकूण 5 कोटी 83 लाख निधी मंजूर झाल्याने या ठिकाणी अत्याधुनिक स्वरूपाचे शासकीय विश्रामगृह लवकरच उभे राहणार आहे.



