कराडमध्ये ‘अभिरुची’ कला महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कराड/प्रतिनिधी : –
येथील ‘अभिरुची’ फिल्म क्लबतर्फे आयोजित तीन दिवसीय कला महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च दरम्यान आयोजित या महोत्सवात चित्रप्रदर्शन, संगीत मैफल, नाट्यप्रयोग, तसेच चित्रपट प्रदर्शन व संवाद अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळाली.
महोत्सवाच्या निमित्ताने ‘द्विचित्र’ या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक व चित्रकार विद्याधर म्हैसकर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात प्रख्यात चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या निवडक चित्रांचे प्रदर्शन करण्यात आले होते. तीनही दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले होते. कराडसह परिसरातील रसिक आणि विद्यार्थ्यांनी याला मोठी उपस्थिती लावली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शास्त्रीय गायिका रोंकिणी गुप्ता यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. अजराडा घराण्याचे तबलावादक आशीष रागवानी यांच्या एकल तबलावादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या दोघांना दीपक मराठे यांनी हार्मोनियमवर साथ दिली. यानंतर ‘इथेच टाका तंबू’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. अश्विनी कासार, ओंकार गोवर्धन, अमेय बर्वे आणि उमेश जगताप यांच्या प्रभावी अभिनयातून लेखक दत्ता पाटील यांची कथा, दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी रंगमंचावर साकारली. एका साध्या चोरीच्या सत्यघटनेतून मानवी स्वभाव, परिस्थिती आणि माणुसकी यांचा विचार करायला लावणारा हा प्रयोग ठरला.
महोत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याशी संवाद सत्र. लेखिका व बालरोगतज्ज्ञ डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर आणि कृष्णा कला महाविद्यालयाच्या प्राचार्या चित्रकार अर्पिता पवार यांनी त्यांची मुलाखत घेतली. या वेळी चित्रकलेतील प्रवास, कलादृष्टी, शिक्षणव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पार्श्वभूमीवर कलाक्षेत्रातील बदल याबाबत त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले.
महोत्सवाच्या समारोपदिनी ग्रामीण भागातील पाणीटंचाई व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारित ‘पाणी’ या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते आदिनाथ कोठारे आणि लेखक नितीन दीक्षित यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपस्थितांना मिळाली. या महोत्सवाला ‘अभिरुची’चे सारंग बेलापूरे, डॉ. शर्वरी बेलापूरे, डॉ. अनिरुद्ध दीक्षित, महेश कुलकर्णी, राजेश पटेल, केशव कुलकर्णी यांसह अनेक सभासद व कला रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अजय ब्रह्मनाळकर यांनी केले, तर आभार उदयन कुलकर्णी यांनी मानले.



