सातारा जिल्हाहोम

कराडच्या यशवंत हायस्कूलची बाह्य मूल्यांकनात ‘ए प्लस’ मानांकन

कराड/प्रतिनिधी : – 

शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मापदंड प्रस्थापित करत रयत शिक्षण संस्थेच्या येथील यशवंत हायस्कूल, कराडने महाराष्ट्र शासनाच्या 2025-26 या वर्षातील बाह्य मूल्यांकन प्रक्रियेत ‘ए प्लस’ (A+) श्रेणी प्राप्त केली आहे. राज्य शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्यांतर्गत मिळालेल्या या मानांकनामुळे कराडच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अॅड. सत्यजित पवार म्हणाले, सातारा जिल्ह्यातील केवळ 18 शाळांना ‘ए प्लस’ मानांकन मिळाले असून, कराड तालुक्यातील ही एकमेव मराठी माध्यमाची शाळा ठरली आहे. त्यामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

माजी मुख्याध्यापक एस. एम. महामुलकर म्हणाले, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या प्रक्रियेत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकास या विविध निकषांवर सखोल पडताळणी करण्यात आली. त्या सर्व बाबींमध्ये यशवंत हायस्कूलने उल्लेखनीय कामगिरी करत उच्च श्रेणी मिळवली.

जून 1959 मध्ये स्थापन झालेल्या या विद्यालयाने माजी आमदार स्व. भाई केशवराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक परंपरा जोपासली. सध्या रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अॅड. रवींद्र पवार व जनरल बॉडी सदस्य अॅड. सत्यजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शाळेने गुणवत्तेचा नवा अध्याय लिहिला आहे. माजी सहाय्यक विभागीय अधिकारी ए. एम. मणेर आणि तत्कालीन मुख्याध्यापक एस. एम. महामुलकर यांच्या योगदानाचीही यावेळी विशेष दखल घेण्यात आली.

Related Articles