सातारा जिल्हाहोम

कोल्हापूर सर्किट बेंच स्थापनेबद्दल कराड वकील संघाकडून भूषण गवई यांचा सत्कार 

कराड/प्रतिनिधी : – 

भूषण गवई यांनी देशाचे सरन्यायाधीश म्हणून कार्य करत असताना न्यायव्यवस्थेत मोलाचे योगदान दिल्याबद्दल, तसेच मुंबई उच्च न्यायालयचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर कराड वकील संघाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

उंडाळे (ता. कराड) येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील यांच्या हस्ते ‘स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार’ प्रदान करून गवई यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी निवृत्त न्यायाधीश रणजीत मोरे, प्रदीप देशमुख, उदयसिंह पाटील उंडाळकर, विजयसिंह पाटील उंडाळकर यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने वकील, कराड वकील संघाचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात कराड वकील संघाचे अध्यक्ष अॅड. दीपक थोरात यांनी गवई यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. न्यायनिष्ठा, साधेपणा आणि मूल्याधिष्ठित नेतृत्व या गुणांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

न्याय म्हणजे केवळ निकाल नव्हे, तर संविधानाप्रती असलेली निष्ठा, सामान्य नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि निर्भीड निर्णयक्षमता होय, अशी भूमिका गवई यांनी आपल्या कार्यकाळात अधोरेखित केली. त्यांच्या कार्यातून नवोदित वकिलांना प्रेरणा व दिशा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन झाल्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांतील पक्षकारांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात व सोयीस्कर पद्धतीने न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच ग्रामीण भागातील युवा वकिलांना उच्च न्यायालयात काम करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.

Related Articles