प्रभाग ८ मधील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी लवकरच निधी – आमदार डॉ. अतुल भोसले यांची ग्वाही

कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याकडे प्रभाग क्रमांक ८ मधील खराब झालेल्या अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्ती व डांबरीकरणाच्या मागणीचे निवेदन नगरसेविका किशोरी शिंदे यांनी आमदार डॉ. अतुल भोसले यांना सादर केले. त्यास आमदार भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या अधिवेशनात आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे ठोस आश्वासन दिले.
प्रभागातील विविध भागांतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, नागरिकांकडून वारंवार दुरुस्तीची मागणी होत होती. याची दखल घेत संबंधित रस्त्यांची यादी व अंदाजित खर्चासह विकासकामांचा प्रस्ताव नगरसेविका किशोरी शिंदे यांनी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावात निकम पार्क शिंदे गल्ली ते तवर गल्ली चौक, डुबल गल्ली किरपेकर दुकान ते शिंदे गल्ली, तसेच मोघे यांचे घर ते मारुती मंदिर, बटाणे मंदिर ते पंढरपूर अर्बन बँक रस्ता, पंपिंग स्टेशन नं. २ ते संजीवनी अपार्टमेंट, सोमवार पेठ एकांडे बोळ ते भैया बडे घर, पंताचा कोट ते पालकर शाळा, जनकल्याण पतसंस्था ते मर्चंट पतसंस्था मुख्य कार्यालय रस्ता आदी महत्त्वाच्या अंतर्गत मार्गांचा समावेश आहे.
या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून, नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेता ही कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. आमदार डॉ. भोसले यांनी प्रभागातील रस्त्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत लवकरच निधी उपलब्ध करून कामांना गती देण्यात येईल, असा शब्द दिला. यावेळी माजी नगरसेवक अतुल शिंदे व विद्यमान नगरसेवक विजय वाटेगावकर उपस्थित होते.



