सातारा जिल्हाहोम

कराड-चांदोली मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

कराड/प्रतिनिधी : –

कराड-चांदोली मार्गावर काले गावाच्या हद्दीत गुरुवारी सकाळी भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. डाळिंबी बाग परिसरात संतोष पाटील यांच्या घरासमोर हा अपघात झाला. रस्ता ओलांडताना वेगात येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने बिबट्या जागीच ठार झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कराड वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर वनपाल आनंद जगताप, अभिजीत शेळके, कैलास सानप, वनरक्षक अक्षय पाटील, तसेच वनसेवक धनाजी गावडे व भरत पवार यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. वनविभागाच्या प्राथमिक तपासानुसार मृत बिबट्या सुमारे दीड वर्षांची मादी असून, तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी मृतदेह कराड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

दरम्यान, कराड तालुक्यातील ग्रामीण भागात वन्यप्राण्यांची वर्दळ वाढत असल्याने वाहनचालकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. वनविभागानेही वाहनधारकांना आवाहन केले असून, वनक्षेत्रालगतच्या रस्त्यांवर वेगमर्यादा पाळून सावधगिरीने वाहन चालवावे, तसेच रस्ता ओलांडणाऱ्या वन्यप्राण्यांकडे दुर्लक्ष करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles