सातारा जिल्हाहोम

(कै.) प्रा.आर.वाय. कणसे यांनी सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले – डॉ. सुरेश भोसले

कराड/प्रतिनिधी : –

(कै.) प्रा.आर.वाय. कणसे यांनी जयवंतराव भोसले यांच्यासमवेत काम करताना सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. वाचनाची सखोल आवड आणि शेतीतील अभ्यासपूर्ण दृष्टी यामुळे त्यांनी आदर्श जीवनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या जीवनातील संघर्ष, कृतज्ञता आणि मूल्यनिष्ठ विचार या पुस्तकातून प्रत्ययास येतात. हे ऑडिओ पुस्तक समाजाला सकारात्मक वाटचालीची प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला.

व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या विचारांचा आणि कृतिशील जीवनाचा प्रेरणादायी वारसा जपणारे (कै.) प्रा. आर. वाय. कणसे यांचे “कृतार्थ मी, कृतज्ञ मी” हे ऑडिओ पुस्तक प्रकाशन सोहळा शेणोली येथे डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब पाटील यांनी, कणसे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य त्यांच्या कुटुंबीयांकडून होत असल्याचे सांगितले. ‘कृतार्थ मी, कृतज्ञ मी’ हे पुस्तक प्रत्येकाने ऐकावे व वाचावे, असे आवाहन त्यांनी केले.

माजी आमदार आनंदराव पाटील यांनीही कणसे यांचे चरित्र समाजाला दिशा देणारे असल्याचे नमूद केले. त्यांच्या आयुष्यातील मूल्याधिष्ठित विचार तरुणांसाठी मार्गदर्शक ठरतील, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. विजया कणसे, बाळासाहेब कणसे, चैतन्य कणसे, मानसी कणसे, प्रशांत कणसे व पैलवान प्रमोद कणसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संयोजन स्थानिक युवकांनी केले. सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते यांनी तर आभार प्रदर्शन सुनील शामराव कणसे यांनी केले. कणसे यांच्या कार्याची आठवण करून देणारा आणि त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा हा प्रकाशन सोहळा भावनिक व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Related Articles