आयुष्यमान स्पेशलसातारा जिल्हाहोम

चिमणीच्या घरट्यात घुसलेल्या कावळ्याला बाहेर काढूया – रामकृष्ण वेताळ

वडोली निळेश्वर येथे विजयी सभा उत्साहात

कराड / प्रतिनिधी : –

सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेल्या कराड उत्तर मतदारसंघामध्ये चिमणीच्या घरट्यात कावळा घुसलाय. त्याला बाहेर काढूया, असे प्रतिपादन कराड उत्तरचे युवा नेते रामकृष्ण वेताळ यांनी केले.

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोपर्डे हवेली गटातून अपक्ष उमेदवार सौ. विद्या वेताळ या भरघोस मतांनी विजयी झाल्या. यानिमित्त दि. 17 रोजी वडोली निळेश्वर, ता. कराड येथे आयोजित विजयी सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास सोसायटीचे चेअरमन सुरेश पाटील होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सचिन नलवडे, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार, माजी सरपंच बाळासो पवार, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष बजरंग पवार, सोसायटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण, अॅड. महादेवराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रामकृष्ण वेताळ म्हणाले, जिल्हा परिषदेची निवडणूक ही झाकी आहे. 2029 ला सर्वांचा हिशोब केला जाईल. काही अवैद्य धंदेवाले बढाया मारू लागलेत. मी तोंड उघडले तर पळता भुई थोडी होईल, अशा आपल्या खास शैलीत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

या सभेमध्ये विजयी उमेदवार सौ. विद्या वेताळ यांनी, यशवंत विचारांची पाठराखण करण्यासाठी आणि कोपर्डे हवेली गटाचा सुसंस्कृतपणा जपण्यासाठी आपणाला मदत करणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानून सदैव तुमच्या सेवेत राहील, अशी ग्वाही दिली.

अध्यक्ष सुरेश पाटील यांनी, 2029 च्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आजपासूनच तयारी करण्याचा संदेश सभेला जमलेल्या लोकांना दिला. सचिन नलवडे यांनी, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन परक्या ऐवजी घरच्यांची सोबत करूया आणि विधानसभेला चित्र बदलूया, असे आवाहन केले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या विजयी सभेला कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. वडोली निळेश्वर गावच्या परिसरातील ही सर्वात उच्चांकी गर्दीची सभा असल्याचे बोलले जात होते.

या सभेस बाळासो पवार, श्रीरंग चव्हाण, रंगराव चव्हाण, भानुदास पोळ, प्रल्हाद भोसले, संजय पिसाळ, सचिन नांगरे, मा. उपसरपंच जालिंदर पवार, मा. उपसरपंच दयानंद पवार, ग्रामपंचायत सदस्य रमेश पवार, जगन्नाथ वाघमारे, भिकाजी वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सभेचे प्रस्ताविक रोहित डुबल यांनी. तर सूत्रसंचालन श्री. तडाके सर यांनी केले. आभार बाळासो पवार यांनी मानले.

 

श्री वेताळ हे सत्तेच्या केंद्र स्थानी यांची विधानसभेकडे वाटचाल !

 

 

या सभेतील हे वाक्य भाजपमधील सत्ता संघर्ष यापुढेही कायम राहणार असल्याचे सूचक होते. यामुळे घरचा-बाहेरचा, आपला-परका असा वाद यापुढेही उफाळून येऊन 2029 पर्यंत पूलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. या वादाचा परिणाम पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. श्री. वेताळ यांनी विधानसभेची तयारी सुरू केल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे.

Related Articles