सातारा जिल्हाहोम

गोंदीतील भाऊ-बहिणींचे राज्यसेवेत यश 

कराड/प्रतिनिधी : –

कराड तालुक्यातील गोंदी गावाने पुन्हा एकदा अभिमानाची उंच भरारी घेतली आहे. सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील सख्या भाऊ-बहिणीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गावाचा तसेच कुटुंबाचा नावलौकिक उंचावला आहे.

गोंदी गावचे सुपुत्र, माजी सरपंच स्वर्गीय प्रल्हाद मारुती पवार (तात्या) यांचे नातू तथा श्री. जयवंत प्रल्हाद पवार यांची कन्या कु. आरती जयवंत पवार हिने Maharashtra Public Service Commission मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात ३४ वी रॅंक मिळवून उल्लेखनीय यश मिळवले आहे. तिची तालुका कृषी अधिकारी पदावर निवड झाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी ठरली आहे.

याच कुटुंबातील तिचा भाऊ जीवन पवार हा यापूर्वीच Maharashtra Police दलात, पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गृह विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सेवेत कार्यरत आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन्ही भावंडांनी शासन सेवेत स्थान मिळवून गोंदी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषद सदस्य व रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी अभिनंदन करत, “ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर मोठी स्वप्ने साकार करू शकतात, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. इतर तरुणांनीही या यशातून प्रेरणा घ्यावी,” असे प्रतिपादन केले.

गोंदी गावात या यशाबद्दल आनंदाचे वातावरण असून, विविध क्षेत्रातिल मान्यवराकडून, ग्रामस्थांकडून भावंडांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या या भावंडांमुळे संपूर्ण कराड तालुक्याचा अभिमान उंचावला आहे.

Related Articles