उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रितीसंगमावर अभिवादन

कराड/प्रतिनिधी : –
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सोमवारी कराड येथील प्रितीसंगमाला भेट देऊन आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिला कराड दौरा होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार नितीनकाका पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नाही. प्रितीसंगमावरील कार्यक्रमानंतर त्या फलटण तालुक्यातील तरडगाव येथे रवाना झाल्या. तेथे त्यांनी विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
कराड दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी सौ. वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमजवळील वेणूताई चव्हाण स्मारकासही भेट दिली. स्मारकातील यशवंतराव चव्हाण व वेणूताई चव्हाण यांच्या जतन केलेल्या स्मृतिसंग्रहाची त्यांनी पाहणी केली. यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी चव्हाण दाम्पत्याच्या सामाजिक व राजकीय योगदानाची माहिती दिली.


