कराड उपजिल्हा रुग्णालयातही अपंगत्व प्रमाणपत्राची सोय व्हावी
नगरसेविका अनिता पवार- पोळ यांची मागणी

कराड / प्रतिनिधी : –
कराड व पाटण तालुक्यातील शारीरिक अपंगत्वाचे म्हणजेच मतिमंदत्व, कर्णबधीर, मुकबधीर, अंधत्व याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी संबंधितांना सातारा जिल्हा रुग्णालयात हेलपाटे मारावे लागतात. खूप त्रास सहन करावा लागतो, त्यांचा व त्यांच्या नातेवाईकांचा वेळ व पैसा वाया जातो. तरी, अशी प्रमाणपत्रे कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातच मिळण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी नवनिर्वाचित नगरसेविका अनिता प्रभाकर पवार- पोळ यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे लेखीपत्र येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय अधीक्षकांना दिले आहे.
नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व नगरसेवक विजयसिंह यादव यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली असून, त्यांनी या मागणीस पाठिंबा देताना, शासन दरबारी ही न्याय मागणी मान्य होण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. हे निवेदन संबंधितांना सादर करताना, अनिता पवार- पोळ यांचे समवेत मुंढे गावचे सरपंच सुमित साळवे, शुभम शिंदे, प्रतीक पोतदार, तुषार पोळ, अक्षय पवार तसेच अक्षय पवार मित्रपरिवार, अजंठा ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या मागणीपत्रात म्हटले आहे की, कराड व पाटण तालुक्यातील शारीरिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याकामी आठवड्यातून किमान दोन दिवसतरी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची आपल्या रुग्णालयात उपस्थिती असावी. जेणे करून, प्रमाणपत्राच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल. तरी, आपण या मागणीचा गांभीर्याने विचार करून, प्रमाणपत्राच्या लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी अनिता पवार- पोळ यांनी निवेदनात केली आहे.


