सातारा जिल्हाहोम

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे वाढते वर्चस्व 

भाजपमध्ये वरचष्मा; लोकसभा, विधानसभा, नगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीत लक्ष 

कराड/प्रतिनिधी : – 

भारतीय जनता पार्टीमध्ये सातारा जिल्ह्यातील प्रभावशाली नेतृत्व म्हणून आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची अल्पावधीत ओळख निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख सर्वश्रुत आहे. त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसह नगरपालिकेतही सातारा जिल्ह्यात मोठे यश मिळवले असून, अल्पावधीतच त्यांनी भाजपमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

लोकसभा निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे युवा नेतृत्व डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर सातारा जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी संपविण्यात आली. ती यशस्वीपणे पार पाडत त्यांनी भाजपचा खासदार निवडून आणला. त्यानंतर दक्षिणेत विधानसभेतही बाजी भारत स्वतः आमदार झाले. ही घोडदौड पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर सातारा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. त्या कसोटीतही पात्र ठरत मलकापूर नगरपालिकेत त्यांनी एकहाती विजय मिळवला. तसेच जिल्ह्यातील अन्य पालिका निवडणुकांतही त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मोठे यश मिळाले आहे.

आता त्यांच्यावर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये जिल्ह्यात भाजपचा वारू सुसाट नेण्याची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने त्यांनी रणनीती आखत राजकीय डाव – प्रतिडाव खेळण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री स्वर्गीय विलासकाका पाटील – उंडाळकर यांचे पुतणे ॲड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील – उंडाळकर यांना भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून येळगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी घोषित करत आमदार अतुलबाबा भोसले यांनी मोठा धक्का देत काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत (अजितदादा पवार) प्रवेश केलेल्या स्वर्गीय विलासकाकांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांना चेकमेट दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी आता उंडाळकर विरुद्ध उंडाळकर अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. या त्यांना कितपत यश येथे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

अनेकांची नाराजी, मनधरणीचा प्रयत्न 

एकीकडे आमदार अतुलबाबा भोसले हे आपले राजकीय कसब पणाला लावत राज्यात सातारा हा भाजपचे सर्वाधिक वर्चस्व असलेला जिल्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यादृष्टीने त्यांना यशही मिळत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मात्र भाजपचे अनेक निष्ठावंत आणि दिग्गज नेते भाजपपासून दुरावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नगरपालिकेतही याचा नुकताच प्रत्यय आला असताना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधावा, अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र तरीही काहीजण नाराज असल्याने त्यांनी बंडखोरी करण्याचा पवित्रा घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अर्ज माघारी घेण्यासाठी अनेकांची विनवणी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

उत्तरेत दिग्गज्यांची नाराजी व बंडखोरी 

जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होत असताना उत्तरेतील अनेक दिग्गज, निष्ठावंत नेत्यांवर अन्याय झाला असल्याचे चित्र दिसून येत आहेत. यामध्ये रामकृष्ण वेताळ, उंब्रजचे ॲड. साळुंखे अशा निष्ठावंत नेत्यांना डावलत आयत्या वेळी पक्षात आलेल्या लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी मोठा हस्तक्षेप केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उत्तरेतील अनेक दिग्गज नेत्यांच्या नाराजीला भाजपला सामोरे जावे लागत असून, अनेकांनी बंडखोरी केल्याने या ठिकाणी पक्षाची डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.

Related Articles