साखर शाळेच्या विद्यार्थ्यांना कृष्णा कारखान्याचा मदतीचा हात
कराड/प्रतिनिधी : –
शेकडो किलोमीटर लांब येऊन पोटासाठी राबणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणात मदत करण्यासाठी कृष्णा कारखान्याने मायेचा हात दिला आहे. साखर शाळेच्या २६५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत कृष्णा कारखान्याने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.
ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांच्या मुलांना त्यांच्या पालकांसोबत कारखाना परिसरात स्थलांतर करावे लागते. तेंव्हा ते गाव व गावातील शाळा यांपासून सहा महिने बाहेर असतात. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण न होता ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात. म्हणून अशा मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याने चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना परिसरात चार साखर शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत.
शालेय साहित्य वाटप कार्यक्रमावेळी बोलताना मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार म्हणाले, कृष्णा कारखान्यासाठी ऊसतोड करण्यासाठी राज्यातून बीड, जालना, धाराशिव, परभणी, सोलापूर इत्यादी जिल्ह्यातील ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या माध्यमातून ऊसतोड मजूर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कृष्णा कारखान्याने पुढाकार घेतला असून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले आहे. शालेय साहित्यात पाटी, पुस्तके, वही, पेन,पेन्सिल, चित्रकला वही तसेच गोष्टींची पुस्तके यांचा समावेश आहे.
साखर शाळेसाठी जनार्थ सेवा संस्थेचे सहकार्य लाभले आहे. याप्रसंगी जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, शिक्षिका राधिका लोखंडे, स्वाती चोपडे, मानसी चोपडे, मयुरी वडकर, अमृता धर्मे,अश्विनी गायकवाड, दीपाली हुलवान, शेती व उसविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.


