सातारा जिल्हाहोम

मलकापूर नगरपालिकेत नगरसेवकांनाच बसण्यासाठी पुरेशा बैठक व्यवस्थेचा अभाव 

दादासो शिंगण यांचे नगराध्यक्षांना निवेदन; आंदोलनाचाही दिला इशारा

कराड/प्रतिनिधी : –

मलकापूर नगरपालिकेच्या सभागृहातील अपुऱ्या बैठक व्यवस्थेमुळे नगरसेवक, अधिकारी व पत्रकारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, याबाबत नगरसेवक दादासो शिंगण यांनी नगराध्यक्ष तेजस सोनावले यांना निवेदन दिले आहे. तसेच बैठक लक्ष्मी हॉलमध्ये घ्यावी. अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेच्या सध्याच्या सभागृहात केवळ २० खुर्च्या उपलब्ध असून, एकूण २५ नगरसेवक आहेत. त्यामुळे अनेक नगरसेवकांना बसण्याचीही योग्य व्यवस्था नाही. सभागृहाची लांबी-रुंदी मर्यादित असल्याने विभागीय प्रमुख व पत्रकारांना बसण्यासाठी जागा नसून, चहाच्या गाडीवरील बाकड्यावर बसण्याची वेळ येत असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. सन २००८ पासून २४×७ माध्यमांतून नावारूपाला आलेल्या नगरपालिकेचे कामकाज असेच चालणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

यापूर्वी शेवटची बैठक नवीन प्रशासकीय इमारतीत घेतली असताना, आता त्या जागेचा विचार का केला जात नाही, असा प्रश्नही शिंगण यांनी अधोरेखित केला आहे. सध्या नगरपालिकेचे कामकाज व कागदपत्रे तीन ठिकाणी विभागली गेल्याने समन्वयाचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व सुविधा असलेल्या लक्ष्मी हॉलमध्ये बैठक घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याची दाखल न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही नगरसेवक दादासो शिंगण यांनी दिला आहे.

Related Articles