सातारा जिल्हाहोम

प्रेमलाकाकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व कला गुणदर्शन उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

प्रेमलाकाकी माध्यमिक विद्यालय, विजयनगर, एन.एस.जी. एज्युकेशन पॅटर्न विजयनगर, तसेच नॅशनल सायन्स गुरुकुल, चाफळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेमलाकाकी माध्यमिक विद्यालयाच्या आवारात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विविध कला गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व विधानपरिषदेचे माजी आमदार आनंदराव पाटील होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप पाटील, कराड रोटरी क्लबचे सदस्य सलीम मुजावर, तसेच सह्याद्री कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र पाटील उपस्थित होते.

वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थी व पालकांसाठी आनंदाचे पर्व असते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी डॉ. दिलीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. शालेय जीवनातच व्यायाम व आरोग्यदायी सवयी अंगीकारल्यास निरोगी आयुष्य जगता येते, असे त्यांनी सांगितले.

रामचंद्र पाटील व सलीम मुजावर यांनी विविध उपक्रमांमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी, विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमास विजयनगरच्या सरपंच सौ. अनिता संकपाळ, उपसरपंच मानसिंग पाटील, संस्थेचे सचिव प्रतापसिंह पाटील, युवा उद्योजक रजतराज पाटील, माजी सरपंच संजय शिलवंत, उत्तमराव केसे, हिम्मतराव देसाई, एन.एस.जी. पॅटर्नचे शंभूराज पाटील, मुख्याध्यापक चव्हाण, पाडळी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक श्री. पाटील यांच्यासह विजयनगर, केसे व पाडळी परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्याध्यापक चव्हाण यांनी केले, तर आभार शंभूराज पाटील यांनी केले. विविध कला व उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.

Related Articles