सातारा जिल्हाहोम

‘नरेडको’च्या प्रदर्शनास व्यावसायिक, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल – राजेंद्रसिंह यादव

मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शन मंडप उभारणीच्या कामाचे भूमिपूजन 

कराड/प्रतिनिधी : – 

कराड व मलकापूर शहर परिसरात तब्बल दहा ते पंधरा वर्षांनंतर बांधकाम साहित्य व प्रॉपर्टी क्षेत्राशी संबंधित भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून, हे प्रदर्शन जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रासाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे. नागरिक, गुंतवणूकदार, तसेच बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांकडून या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करत नगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी व्यक्त केला.

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) कराडच्या वतीने आणि एस्कॉन इन्फ्रा एलएलपी यांच्या सहप्रायोजकत्वाखाली ‘होमथॉन १.०’ हे बांधकाम साहित्य व प्रॉपर्टी क्षेत्रातील प्रदर्शन दि. २३ ते २७ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या मंडप उभारणी कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नरेडको कराडचे संस्थापक, अध्यक्ष अरविंद खबाले, उपाध्यक्ष लोंढे, सचिव संदीप शिंदे, खजिनदार अजित पाटील, तसेच बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले, कराड आणि मलकापूर ही दोन्ही शहरे विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘नरेडको’ने आयोजित केलेले हे प्रदर्शन बांधकाम व्यवसायिकांसाठी मोठी संधी ठरणार असून, दोन्ही शहरांच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणारे आहे. या प्रदर्शनासह संस्थेच्या कार्यासाठी दोन्ही नगरपालिकांकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही देत नागरिकांपर्यंत नगरपालिकांच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी कराड व मलकापूर नगरपालिकांना प्रत्येकी एक स्टॉल देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे यांनी, या प्रदर्शनामध्ये आधुनिक बांधकाम साहित्य, नाविन्यपूर्ण डिझाईन, फर्निचर, लाइटिंग, गार्डनिंग, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी, तसेच शासकीय योजना, गृहनिर्माण कर्ज योजना आदींचे विविध स्टॉल असणार आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात नरेडको कराडचे संस्थापक, अध्यक्ष अरविंद खबाले यांनी सन २०१५ मध्ये कराड आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचा अनुभव लक्षात घेऊन, यावेळी अधिक व्यापक आणि कार्पोरेट पातळीवरील प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. पुणे-मुंबईसारख्या महानगरांच्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन जिल्हाभरातील बांधकाम व्यावसायिकांसह नागरिकांसाठीही लाभदायक ठरणार आहे. या प्रदर्शनात कराड व मलकापूर नगरपालिकांसाठी प्रत्येकी एक स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles