सातारा जिल्हाहोम

काले-किरपे गावांतील अंतर्गत रस्त्यांसाठी ८० लाखांचा निधी मंजूर

आ. डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नांना यश

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काले व किरपे गावांमधील अंतर्गत रस्ते सुधारणा व काँक्रीटीकरणाच्या कामांसाठी एकूण ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून, राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाने याबाबतचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध केला आहे.

कराड दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आ. डॉ. अतुल भोसले हे सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांची दखल घेत, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत २५-१५ योजनेमधून काले व किरपे गावांसाठी हा निधी मंजूर केला आहे.

या निधीतून काले गावातील अंतर्गत रस्ते सुधारणा कामासाठी ३० लाख रुपये, तर किरपे गावातील विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये मारुती काशिनाथ देसाई ते पाण्याची टाकी, जिजामाता पाण्याची टाकी ते शिवाजी खाशाबा माने यांचे घर, कृष्णा गणपती माने ते पार्वती रतु माने यांचे घर, विकास जिजाबा देवकर ते संजय मारुती देवकर यांचे घर तसेच तांबवे शिव ते मारुती काशिनाथ देसाई यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यांचा समावेश आहे.

या विकासकामांना लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, त्यामुळे काले व किरपे गावांच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. रस्त्यांच्या सुधारणा झाल्याने ग्रामस्थांची दळणवळणाची अडचण दूर होणार असून, जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

या निधी मंजुरीबद्दल परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार डॉ. भोसले, तसेच महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles