मर्चंट परिवाराच्या ‘स्वर्गरथ’चे लोकार्पण
समाजसेवेचा अभिनव उपक्रम; मर्चंट परिवाराचा समाजाशी असलेला दृष्टिकोन प्रेरणादायी

कराड/प्रतिनिधी : –
स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून घारेवाडी येथील शिवम प्रतिष्ठानमध्ये सुरू असलेल्या बलशाली युवा हृदय सम्मेलन दरम्यान मर्चंट परिवारातर्फे समाजसेवेसाठी निर्माण करण्यात आलेल्या स्वर्गरथ या वाहनाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. हा लोकार्पण सोहळा विचरता समुदाय समर्थन मंच, गुजरातच्या संस्थापिका श्रीमती मित्तल पटेल व शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी कराड अतुल म्हेत्रे, मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे व स्वप्नील कदम, मलकापूर नगराध्यक्ष तेजस सोनवणे, कराड मर्चंटचे कुटुंबप्रमुख सत्यनारायण मिणीयार, कराड मर्चंट चेअरमन माणिकराव पाटील, व्हा. चेअरमन शिवाजीराव जगताप, महिला मर्चंटच्या चेअरमन सौ. कविता पवार, व्हा. चेअरमन सौ. सुवर्णा सादिगले, संचालक राहुल मिणीयार, भास्करराव पाटील, डॉ. शरद क्षीरसागर, वसंतराव हुलवान, किशोर झाड, माहेश्वरी समाजाचे लक्ष्मीकांत मिणीयार, मोहन चांडक, बाळासाहेब लाहोटी, राहुल राठी, कराड मर्चंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक माटेकर तसेच महिला मर्चंटचे व्यवस्थापक पांडुरंग यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मर्चंट परिवाराचे कुटुंबप्रमुख सत्यनारायण मिणीयार म्हणाले, कराड व परिसरात एखाद्या व्यक्तीचे दुःखद निधन झाल्यानंतर मयत व्यक्तीस सन्मानाने स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी सामाजिक ऋणाची जाणीव ठेवून स्वर्गरथ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. जीवनाची यात्रा जशी आनंदाने पार पडते, तशी मृत्यूनंतरची यात्रा देखील शांत व सन्मानाची असावी, या भावनेतून या स्वर्गरथाची निर्मिती करण्यात आली आहे. हा उपक्रम समाजातील सर्व स्तरातील नागरिकांसाठी ना नफा, ना तोटा या तत्वावर राबविण्यात येणार आहे.
इंद्रजित देशमुख म्हणाले, समाजऋणातून आपण कधीच पूर्णपणे उतराई होऊ शकत नाही; मात्र अशा उपक्रमांमुळे जर समाजाचे दुःख थोडेसे जरी हलके करता आले, तरी ते कार्य लाखमोलाचे ठरते. मर्चंट परिवाराचा समाजाशी असलेला जिव्हाळा आणि सेवाभावी दृष्टिकोन प्रेरणादायी असून अशा जाणीवेच्या संस्था उभ्या राहणे ही आजच्या काळाची गरज आहे.
स्वर्गरथाच्या माध्यमातून मर्चंट परिवाराला समाजाची अधिक जवळून सेवा करण्याची संधी मिळाली असून, भविष्यातही समाजोपयोगी उपक्रमांसाठी मर्चंट परिवार सदैव तत्पर राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



