कराड मुख्य टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे
अजंठा युवक मंडळाची मागणी; डाक विभागाच्या अधीक्षकांना निवेदन
कराड/प्रतिनिधी : –
शहरासह परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी कराड मुख्य टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र (POPSK) सुरू करण्यात यावे, अशी मागणी अजंठा युवक नवरात्र उत्सव गणेश मंडळ ट्रस्टच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन अक्षय पवार (पोळ) यांच्या नेतृत्वाखाली कराड डाक विभागाच्या अधीक्षकांना सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कराड व पाटण तालुक्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून शिक्षण, नोकरी, व्यवसाय, उद्योग, व्यापार तसेच पर्यटनासाठी परदेशात जाणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र पासपोर्टसाठी सध्या नागरिकांना दूरच्या पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये जावे लागत असल्याने वेळ, पैसा व श्रमांचा मोठा अपव्यय होत आहे.
कराड तालुका आर्थिकदृष्ट्या सक्षम असून येथे नामांकित शैक्षणिक संस्था, औद्योगिक व व्यापारी केंद्रे मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. त्यामुळे पासपोर्ट अर्ज स्वीकारणे, कागदपत्रांची पडताळणी व संबंधित प्रक्रिया स्थानिक पातळीवरच उपलब्ध झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याचा विशेष फायदा ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना होऊन त्यांचा प्रवास खर्च व वेळ वाचणार आहे.
कराड मुख्य टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यास नागरिकसेवांचा दर्जा उंचावेल तसेच ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमालाही बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कराड-पाटण तालुक्यातील नागरिकांची ही दीर्घकालीन व रास्त मागणी असून याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन अजंठा युवक नवरात्र उत्सव गणेश मंडळ ट्रस्टचे अक्षय पवार (पोळ) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी सुमित साळवे, गौरव जाधव, श्री. चव्हाण, ओंकार गावडे, तेजस पवार, अमर कचरे, अक्षय राऊत, केतन चव्हाण, अरुण मुळीक, सार्थक झुरळे आदी उपस्थित होते.



