राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसीलदार कार्यालयात जनजागृती कार्यक्रम

कराड/प्रतिनिधी : –
दरवर्षीप्रमाणे यंदाही २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने तहसीलदार कार्यालयात ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त महिला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाठ्य सदर करून ‘सजग ग्राहक – सशक्त समाज – सक्षम भारत’ हा संदेश यानिमित्ताने देण्यात येवून जनजागृती केली. कार्यक्रमात ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांचे हक्क व जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास तहसीलदार कल्पना ढवळे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्षा व सातारा जिल्हाध्यक्षा सुनिता राजेघाटगे, तसेच पुरवठा अधिकारी नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात बोलताना तहसीलदार ढवळे म्हणाल्या, ग्राहक हा बाजारव्यवस्थेचा केंद्रबिंदू असून, त्याच्या हक्कांचे संरक्षण होणे, अत्यंत आवश्यक आहे. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नंतर २०१८ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणा व नवीन कायद्यातील १०७ कलमांमुळे ग्राहकांना अधिक व्यापक संरक्षण मिळाले आहे, असे त्यांनी नमूद केले.
पुरवठा अधिकाऱ्यांनी, नागरिकांना खरेदीवेळी पक्के बिल घेणे, हमीपत्र जतन करणे व फसवणूक झाल्यास तात्काळ तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. तसेच ऑनलाईन खरेदीतही ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी, असे सांगितले.
यावेळी उपस्थितांना ग्राहकांना सुरक्षिततेचा हक्क, माहितीचा हक्क, निवडीचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क व नुकसानभरपाईचा हक्क याबाबत अॅड. शिंदे यांनी, माहिती दिली. तसेच नवीन ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ऑनलाईन तक्रार नोंदणीची सुविधाही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये ग्राहक हक्कांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. कार्यक्रमाचे आयोजन ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्षा व सातारा जिल्हाध्यक्षा सुनिता राजेघाटगे, जिल्हा कोषाध्यक्ष नंदकुमार काटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आर.के. जाधव, जिल्हा सहसचिव मधुकर मोरे, तालुका अध्यक्ष कॉम्रेड अधिकराव पाटील, कराड शहर अध्यक्ष नितिन शहा, ग्रामीण अध्यक्ष अॅड. भीमराव शिंदे, कराड शहर सचिव हिरालाल खंडेलवाल, सहकोषाध्यक्ष दत्ताजी खुडे-देशमुख यांसह सर्व पदाधिकारी, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. सर्व पदधिकार्यांचा सत्कार तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आला.



