सातारा जिल्हाहोम

कराड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचा मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानात सहभाग

आमचा फोकस २० टक्के सर्वाधिक उपक्रमशील ग्रामपंचायतीवर- गटविकास अधिकारी प्रताप पाटील 

कराड/प्रतिनिधी : – 

मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान ही अभिनव स्पर्धा महाराष्ट्रात प्रथमच शासनाने राबवली आहे. त्याअंतर्गत राज्यात प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला ५ कोटींचे बक्षिस असून सर्व बक्षिसांची एकूण रक्कम १५७ कोटी इतकी आहे. कराड तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत यामध्ये सहभागी झालेल्या असल्या तरी आम्ही २० टक्के ग्रामपंचायतीवर सर्व लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी दिली.

कराड बाजार समिती, जिल्हा परिषद व राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा प्रकल्प यांच्यावतीने येथील बैल बाजार तळावर सुरू असलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात जिल्हा परिषद कृषी विभागाच्यावतीने मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाचे लाईव्ह मॉडेल उभारण्यात आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती देताना प्रताप पाटील बोलत होते. त्यांचे समवेत कृषी अधिकारी पवन गायकवाड उपस्थित होते.

गटविकास अधिकारी प्रताप पाटील पुढे म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान ही राज्य शासनाची अभिनव योजना आहे. यामध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या ग्रामपंचायतींना संपूर्ण महाराष्ट्रभरात १५७ कोटींची बक्षिसे दिली जाणार आहेत. राज्यात प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला ५ कोटींचे बक्षीस आहे. तर तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला १५ लक्ष, द्वितीय येणाऱ्या ग्रामपंचायतीला १२ लक्ष आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतीला ८ लक्ष रुपये बक्षीस दिले जाणार आहे. जिल्हास्तरावर ही स्वतंत्र बक्षिसे आहेत.

कराड तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती या अभियानामध्ये सहभागी झालेल्या आहेत. मात्र पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही त्यामधील सर्वाधिक उपक्रमशील असणाऱ्या २० टक्के ग्रामपंचायतींवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. या अभियानासाठी आठ प्रकारचे निकष असून त्यानुसार गुण विभागणी करण्यात आली आहे, सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या ग्रामपंचायती तालुकास्तरावर आणि पुढे जिल्हा व राज्यस्तरापर्यंत पोहोचू शकणार आहेत. याबाबतची जनजागृती गावोगावच्या तालुक्यातील ग्रामस्थांच्या पर्यंत पोहोचवण्याचा जिल्हा परिषद कृषी विभागाच्या स्टॉलमधील लाईव्ह मॉडेलच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे. या मॉडेल साठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन मॅडम यांचे सहकार्य मिळाले असून तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानामध्ये कराड तालुका आपला वेगळा ठसा उमटवेल, असा विश्वासही गटविकास अधिकारी पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles