सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
जयवंत शुगर्सला सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार जाहीर
व्ही.एस.आय.ची घोषणा; सर्वोत्कृष्ट आसवणी व्यवस्थापक पुरस्कारही जाहीर
23 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सने दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार पटकाविला आहे. तसेच जयवंत शुगर्सच्या अधिकाऱ्यास सर्वोत्कृष्ट आसवणी व्यवस्थापक पुरस्कारही जाहीर झाला आहे.
संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत शुगर्स उत्कृष्ट वाटचाल करत आहे. सन २०२४-२५ या गळीत हंगामात कारखान्याने मिल विभागात ऊसाचा तंतुमय निर्देशांक ८६.४५ टक्के इतका उच्च नोंदवण्यात आला असून, रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन ९६.१० टक्के इतके साध्य झाले आहे. साखर उत्पादन प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष वाफेचा वापर केवळ ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात यश मिळाले आहे, जे ऊर्जाबचतीच्या दृष्टीने उल्लेखनीय ठरते. तसेच हंगामात साखर उतारा १२.५२ टक्के इतका प्राप्त झाला असून, साखर उत्पादन प्रक्रियेमध्ये बगॅसचा वापर १८.०१ टक्के इतका नियंत्रित ठेवण्यात आला आहे. परिणामी, ११.५४ टक्के बगॅस बचत झाली आहे.
साखर निर्मितीसाठी प्रतिटन ऊसामागे विजेचा वापर २८.५२ किलोवॅट इतका आहे. याशिवाय मागील वर्षाच्या तुलनेत गाळप क्षमतेच्या वापरामध्ये ६.३१ टक्क्यांची वाढ नोंदवली असून, यामुळे उत्पादन व्यवस्थापन व प्रक्रिया कार्यक्षमतेतील सातत्यपूर्ण सुधारणा अधोरेखित होते. ऊर्जा बचत, कार्यक्षम गाळप, सुधारित साखर उतारा व संसाधनांचा काटेकोर वापर यामुळे कारखान्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून, या उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार कारखान्याला जाहीर करण्यात आला आहे.
तसेच कारखान्याचे डिस्टीलरी मॅनेजर विक्रम गोपाळ म्हसवडे यांना सर्वोत्कृष्ट आसवणी व्यवस्थापक पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांचे वितरण लवकरच पुणे येथे केले जाणार आहे. या यशाबद्दल कारखाना व्यवस्थापन, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
23 1 minute read



