सातारा जिल्हाहोम

रेठरे बुद्रुकमधील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पथदर्शी ठरेल – डॉ. सुरेश भोसले

१ कोटी २० लाखांच्या निधीतून मंजूर प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

रेठरे बुद्रुक गावासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचा विशेष प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. गावातील हा प्रकल्प इतर गावांसाठी पथदर्शी ठरेल, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा २ अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर झाला आहे. यासाठी १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर झाला असून, प्रकल्पाचे भूमिपूजन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते होते.

यावेळी पृथ्वीराज भोसले, युवा नेते आदित्य मोहिते, कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, सरपंच हणमंत सूर्यवंशी, उपसरपंच भाग्यश्री पवार, सोसायटीचे चेअरमन व्ही.के. मोहिते, संजय पवार, माजी जि.प. सदस्य शामबाला घोडके, जयवंतराव साळुंखे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जी. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, रेठरे बुद्रुकला मोठे पर्यटन व धार्मिक स्थळ बनविण्याचा संकल्प आ.डॉ. अतुलबाबांनी केला आहे. येत्या १० वर्षांचा विकास आराखडा तयार करुन, आदर्श गाव कसे असावे याचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले जाणार आहे. रेठरे बुद्रुकमध्ये स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवून, त्याचे पाणी शेतीसाठी वापरण्याचा अभिनव प्रयोगही करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते म्हणाले, आपल्या मतदारसंघाला डॉ. अतुलबाबांच्या रुपाने एक कर्तृत्ववान आमदार लाभला आहे. विधानसभेत त्यांच्या कार्याची छाप निश्चितच दिसून येते. रेठरे बुद्रुक गाव आदर्श बनविण्यासाठी छोटे छोटे प्रकल्प करायचे आहेत. त्यासाठी गावाला आ.डॉ. अतुलबाबा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देत आहेत.

सरपंच हणमंत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच भाग्यश्री पवार यांनी आभार मानले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles