नागरिकाचे सन्मानाने जीवन, हीच राज्यघटनेची शिकवण – न्यायाधीश पी.एल. घुले
तारुख ग्रामपंचायतीत कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
भारतातील राज्यघटना ही समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार देते. नागरिकांना कायद्याची माहिती मिळावी आणि न्याय त्यांच्या दारापर्यंत पोहोचावा, हाच या राज्यघटनेचा खरा उद्देश असल्याचे प्रतिपादन सीनियर डिव्हिजन न्यायाधीश पी.एल. घुले यांनी केले.
तारुख (ता. कराड) येथे तारुख ग्रामपंचायत, कराड तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती व कराड वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरात ते बोलत होते.
न्यायाधीश घुले म्हणाले, न्याय आपल्या दारी” ही संकल्पना सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राबविण्यात येत असून, अशा शिबिरांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून कायद्याविषयी जागृती केली जाते. लोकन्यायालयाच्या माध्यमातून वाद, दावे व खटले सामंजस्याने आणि जलदगतीने निकाली काढण्याचा प्रयत्न केला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कराड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. दीपक थोरात, तसेच तारुख गावचे लोकनियुक्त सरपंच सचिन कुराडे उपस्थित होते. यावेळी अॅड. पद्मजा लाड यांनी विवाह विच्छेदासंदर्भातील कायदेशीर तरतुदी स्पष्ट करत, किरकोळ कारणांमुळे विवाह विच्छेद होऊ नये याबाबत मार्गदर्शन केले.
अॅड. भारत मोहिते यांनी, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा, २०१२ यावर सविस्तर माहिती दिली. अॅड. दिग्विजय पाटील यांनी, हिंदू वारसा कायद्याबाबत, तर अॅड. प्रशांत गावडे यांनी पानंद व शेतरस्त्यांबाबत शासनाच्या धोरणाची माहिती दिली. अॅड. किशोर जाधव यांनी, मानवाधिकार विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कराड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. दीपक थोरात यांनी, सामान्य जनतेचा न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास वाढावा आणि न्याय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत तारुख गावचे सरपंच सचिन कुराडे यांनी केले. या शिबिरास तारुख गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती. तसेच कराड तालुका विधी सेवा समितीचे आर.डी. भोपते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आभार ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव यांनी मानले.



