सातारा जिल्हाहोम

मलकापूर नगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता 

कराड/प्रतिनिधी : –

मलकापूर नगरपालिकेत सत्तांतर झाले असून, पहिल्यांदाच भाजपने नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नगराध्यक्ष पदासह एकूण १८ जागांवर भाजपने विजय मिळवत सत्ता हस्तगत केली, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला २ आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ला १ जागेवर समाधान मानावे लागले. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीत भाजपचे उमेदवार तेजस सोनवणे यांनी ५,२७७ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. तेजस सोनवणे (भाजप) १०,७४९ मते, आर्यन कांबळे (समविचारी आघाडी – राष्ट्रवादी/उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ५,४७२ मते, अक्षय मोहिते (शिवसेना शिंदे गट) ७०४ मते मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अक्षय मोहिते यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले; त्यांना हजार मतांचाही टप्पा गाठता आला नाही.

दरम्यान, सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. १२ टेबलांवर ३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली. अनेक प्रभागांत काट्याची टक्कर पाहायला मिळाली. समविचारी आघाडीने काही ठिकाणी जोरदार लढत दिली; मात्र भाजपची संघटनात्मक ताकद आणि मतांचे ध्रुवीकरण निर्णायक ठरले.

या निवडणुकीत प्रभाग १ अ : भाजपच्या अश्विनी शिंगाडे यांनी राष्ट्रवादीच्या कांचन लोहार यांचा २९८ मतांनी पराभव केला, १ ब : शिवसेना (उद्धव गट) चे नितीन काशीद–पाटील ३१९ मतांनी विजयी, प्रभाग २ अ : भाजपच्या गीतांजली पाटील १२१ मतांनी विजयी, २ ब : अपक्ष (समविचारी) भीमाशंकर माउर १०६ मतांनी अनपेक्षित विजय, नेटके नियोजन व स्थानिक संपर्कामुळे भाजपच्या तगड्या उमेदवाराचा त्यांनी पराभव केला. प्रभाग ३ अ : भाजपचे धनंजय येडगे ३१७ मतांनी विजयी, ३ ब : भाजप – बिनविरोध, प्रभाग ४ अ : भाजप – बिनविरोध, ४ ब : भाजपच्या कल्पना रैनाक ४६ मतांनी विजयी, प्रभाग ५ अ : राष्ट्रवादीच्या मृणालिनी इंगवले १३५ मतांनी विजयी, याठिकाणी भाजपला अनपेक्षित धक्का बसला. ५ ब : राष्ट्रवादीचे दादा शिंगण ४९ मतांनी विजयी झाले. या प्रभागात भाजपचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव व शुभांगी माळी यांचा पराभव झाला. निवडणुकीआधी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या यादव यांचा हा पराभव राजकीयदृष्ट्या धक्कादायक मानला जात आहे.

प्रभाग ६ अ : भाजपच्या सीमा सातपुते यांचा ६९० मतांनी दणदणीत विजय झाला, ६ ब : भाजपचे सुरज शेवाळे यांचा ८४७ मतांनी मोठा विजय, तर प्रभाग ७ अ व ७ ब : भाजपच्या दोन्ही जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या, प्रभाग ८ अ : भाजपच्या गीता साठे ३६२ मतांनी विजय, ८ ब : भाजपचे शरद पवार ३८६ मतांनी विजय, प्रभाग ९ अ व ९ ब मध्येही आधीच भाजपच्या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या होत्या. प्रभाग १० अ : भाजपचे प्रमोद शिंदे यांचा ६२४ मतांनी विजय, १० ब : भाजपच्या स्वाती थोरात या ३५५ मतांनी विजयी झाल्या.

प्रभाग ११ अ : भाजपच्या राज्यश्री जगताप ३६२ मतांनी विजयी झाल्या. तर ११ ब : मध्ये भाजपचे मनोहर शिंदे यांना १६६ मतांनी निसटता विजय मिळाला. त्यांना अपेक्षेपेक्षा कमी मताधिक्य मिळाले. अपक्ष नवखे उमेदवार अनुराज थोरात यांनी शिंदेंना चांगलीच झुंज दिली. मनोहर शिंदे यांना ९७०, तर अनुराज थोरात यांना ८०४ मते मिळाली.

Related Articles