सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची सोमवारी १०१ वी जयंती
जंगल अभ्यासक किरण पुरंदरे यांच्या व्याख्यानासह विविध कार्यक्रमांचे आयोजन

कराड/प्रतिनिधी : –
कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांची सोमवार दि. २२ डिसेंबर रोजी १०१ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी (दि. २२) सकाळी ८.३० वाजता कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील स्व. आप्पासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पार्पण व अभिवादन केले जाणार आहे. दुपारी ३ वाजता रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात कराड तालुका साखर कामगार संघ आणि श्री गणेश शिवोत्सव मंडळाच्यावतीने प्रा. ज्ञानदेव काशीद (बीड) यांचे ‘कृष्णाकाठच्या मातीत हवा जयवंतराव भोसले-आप्पासाहेब यांचा जन्म नवा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
तसेच सायंकाळी ५ वाजता कराडच्या कृष्णा विश्व विद्यापीठातील नेचर पार्कमध्ये ‘रानगुंफी’ हे छायाचित्रात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये प्रसिद्ध लेखक आणि जंगल अभ्यासक किरण पुरंदरे हे त्यांचे जंगलातील अनुभव कथन आणि पक्षी व प्राण्यांच्या आवाजांचे थेट सादरीकरण करणार आहेत. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून, यासाठी सर्व नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) स्मृतींना उजाळा देण्यासाठी सोमवारी (ता. २२) कराडसह वाळवा तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. तसेच स्थानिक पातळीवरदेखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.



