सातारा जिल्हाहोम

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

आप्पासाहेबांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे भव्य आयोजन

कराड/प्रतिनिधी : – 

कराडमध्ये रविवारी (दि. २१) ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार रंगणार आहे. या मॅरेथॉनच्या निमित्ताने आरोग्याकडे वाटचाल करण्याचा आणि समाजमनात सकारात्मकता रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार असून, सुमारे २००० हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत.

कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे ‘कृष्णा मॅरेथॉन २०२५’ या आरोग्यदायी व प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन रविवारी (ता. २१) पहाटे ५.३० वाजता कृष्णा विश्व विद्यापीठ परिसरातून उत्साहात सुरू होणार आहे.

सातारा जिल्हा पोलिसप्रमुख तुषार दोशी, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य श्री. विनायक भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉनचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. मॅरेथॉनमध्ये १० किमी व ५ किमी असे दोन गट ठेवण्यात आले असून, स्पर्धकांसाठी वयोगटानुसार स्वतंत्र श्रेणी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १८ वर्षांखालील, १९ ते ३५, ३६ ते ४५, ४६ ते ५५ आणि ५६ वर्षांवरील असे पाच वयोगट समाविष्ट आहेत. त्यामुळे सर्व वयोगटातील धावपटूंना आपली क्षमता आजमावण्याची संधी मिळणार आहे.

स्पर्धकांना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी कृष्णा विश्व विद्यापीठामार्फत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक सहभागीला मेडल, मॅरेथॉन बिब, टी-शर्ट देण्यात येणार असून, फिजिओथेरपी सपोर्ट, वैद्यकीय मदत, नाश्ता तसेच प्रत्येक दोन किलोमीटरवर हायड्रेशन पॉइंट्सची सुविधा उपलब्ध असणार आहे. शर्यत पूर्ण करणाऱ्या सर्व धावपटूंना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय मार्ग व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, स्वयंसेवकांचे जाळे व वैद्यकीय यंत्रणा यांचीही काटेकोर तयारी करण्यात आली आहे.

Related Articles