सातारा जिल्हाहोम

गोटे ग्रामपंचायत सचिवालयाचे शनिवार उद्घाटन व काँग्रेसचा मेळावा

सौ. सुनंदा पाटील यांचा वाढदिवस व अभिष्टचिंतन सोहळ्याचेही आयोजन

कराड/प्रतिनिधी : –

गोटे ग्रामपंचायत सचिवालयाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त काँग्रेस पक्षाच्यावतीने मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भूषविणार असून, त्यांच्या हस्ते नव्या सचिवालयाचे उद्घाटन होणार आहे.

याचवेळी काँग्रेसच्या नेत्या सौ. सुनंदा नामदेव पाटील यांचा वाढदिवस व अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा संयुक्त कार्यक्रम शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गोटे ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणार आहे.

गोटे ग्रामपंचायत सचिवालयासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून भरघोस निधी मंजूर झाला होता. या निधीतून सुसज्ज व आधुनिक इमारतीचे काम पूर्ण झाले असून, या नव्या सचिवालयामुळे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, गतिमान व लोकाभिमुख होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

या कार्यक्रमास उदयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितराव पाटील – चिखलीकर आणि माजी पंचायत समिती नामदेवराव पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच गोटे ग्रामपंचायतीच्या सरपंच वहिदा शेख, उपसरपंच कोमल लादे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन समारंभानंतर सौ. सुनंदा नामदेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व काँग्रेसचा भव्य मेळावा होणार असून, या कार्यक्रमामुळे वारुंजी जिल्हा परिषद गटासह संपूर्ण परिसरात राजकीय व सामाजिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles