तारूख ग्रामपंचायतीत मोफत नेत्र तपासणी शिबीर उत्साहात
सात नागरिकांना मोतीबिंदू आढळल्याने तत्काळ मोफत शस्त्रक्रिया

कराड/प्रतिनिधी : –
तारूख (ता. कराड) येथे ग्रामपंचायत तारूख आणि श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स नेत्र हॉस्पिटल, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी (७ नोव्हेंबर) रोजी पार पडलेल्या या शिबिराचा तब्बल १५० गरजू नागरिकांनी लाभ घेतला.
शिबिरात डॉ. शुभाष करे, जोती जाधव, डॉ. सुप्रिया व डॉ. सुनिता यांनी नेत्र तपासणी केली. तपासणीदरम्यान सात नागरिकांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे, या सर्वांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया विजयसिंहराजे पटवर्धन रुग्णालय, सांगली येथे करण्यात आली, ही बाब ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा ठरली.
या उपक्रमासाठी सरपंच सचिन कुराडे, उपसरपंच सुनील पाटील, सदस्य राजेंद्र जाधव, अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी अनिक (बापू) घराळ, विवेक बुराडे, युवराज कुरोडे तसेच समाजसेवक श्रीरंग कुराडे यांचे विशेष सहकार्य लाभले. ग्रामपंचायत कर्मचारी सुहास कुराडे, प्रकाश भिसे व राजन देसाई यांनी शिबिराचे योग्य नियोजन केले.
समाजसेवक श्रीरंग कुराडे यांनी नेत्रदान आणि अवयवदानाचे महत्व पटवून देताना, अवयवदान ही ईश्वरीय सेवा असून याबाबत भविष्यात मोठी जनजागृती चळवळ उभारण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.



