Uncategorized

कराडमध्ये रविवारी स्वातंत्र्य सेनानी माधवराव जाधव जन्मशताब्दी सोहळा

कराड/प्रतिनिधी : –

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी वीर माधवराव (दादा) जाधव यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि कराड – साताऱ्याच्या विकासातील अनन्यसाधारण कार्य भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कराड येथे त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या स्नुषा श्रीमती सुनिता दिलीप जाधव यांनी दिली.

कराड अर्बन बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, समितीचे सदस्य ॲड. संभाजीराव मोहिते, बँकेचे चेअरमन समीर जोशी, तसेच स्वातंत्र्य सेनानी जाधव यांचे नातू अमर जाधव आणि तनय जाधव उपस्थित होते.

श्रीमती जाधव म्हणाल्या, स्वातंत्र्य सेनानी माधवराव जाधव हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निकटवर्ती सहकारी होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. कराड शहर आणि परिसरातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांचे योगदान मोठे असून, सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची निर्मिती, रिमांड होम उभारणी, तसेच सह्याद्रि सहकारी साखर कारखाना उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी केले. राज्यात होमगार्डची संकल्पना मांडण्याचा मानही त्यांना जातो. त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेपासून होमगार्ड रचनेपर्यंतचा प्रवास आणि कराड – सातारा विकासातील योगदान यांचा अभ्यासपूर्ण इतिहास पुस्तक रूपाने शब्दबद्ध करण्यात आला असून, त्यांच्या संपूर्ण कार्याचा समग्र इतिहासावर समितीकडून पुस्तक तयार करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपटाची निर्मिती करण्यात आली असून, तो जन्मशताब्दी सोहळ्यात प्रदर्शित केला जाणार आहे.

जन्मशताब्दी सोहळ्याची रूपरेषा स्पष्ट करताना समिती सदस्य ॲड. संभाजीराव मोहिते म्हणाले, स्वातंत्र्यलढ्यात माधवराव जाधव यांनी दाखवलेला भीम पराक्रम अद्वितीय आहे. ब्रिटिश सरकारविरुद्ध रेल्वे अडवणे, पोस्ट ऑफिस लुटणे, विद्युत तारा तोडणे, त्यांनी मारलेली ऐतिहासिक क्रांती उडी यांसारख्या अनेक क्रांतिकारक कृतींमुळे त्यांच्यावर तब्बल 107 खटले दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दहा टक्के खटल्यांत ते निर्दोष सुटले. एकूण खटल्यांमध्ये त्यांना 135 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. महात्मा गांधींच्या ‘चले जाव’ आंदोलनाला प्रतिसाद देणाऱ्या सेनानींपैकी ते अग्रस्थानी होते. परंतु दुर्दैवाने त्यांचा इतिहास काळाच्या ओघात विस्मृतीत गेला असून, तो राष्ट्रीय पातळीवर उजेडात आणण्यासाठी हा जन्मशताब्दी सोहळा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

जन्मशताब्दी सोहळा रविवार, दि. 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे माजी चेअरमन व संचालक सुभाषराव एरम, कराड प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, तसेच बँकेचे विद्यमान चेअरमन समीर जोशी उपस्थित राहणार आहेत. जाधव कुटुंबियांसह मान्यवरांचे मनोगतही यावेळी व्यक्त होणार आहे. स्वातंत्र्य सेनानी, त्यांचे कुटुंबीय, आजी-माजी सैनिक, नागरिक व युवकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीकडून करण्यात आले.

माधवराव जाधव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समितीकडून वर्षभर विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. जन्मदिनी रविवारी 14 डिसेंबर रोजी रिमांड होममधील मुलांना विविध सोयी-सुविधा देण्यात येणार असून, त्यांच्यासाठी आयटी लॅब उभारण्यात येणार आहे. तसेच या दिवशी दंत तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सौ. सुनिता जाधव आणि ॲड. मोहिते यांनी दिली.

वृक्षमित्र चंद्रकांत जाधव यांचा सत्कार

शिवाजीनगर हाउसिंग सोसायटीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या निर्मितीसह विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या वृक्षमित्र चंद्रकांत जाधव यांचा जन्मदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कराड व परिसरातील वृक्षसंवर्धन, उद्यान विकास आणि विविध सामाजिक उपक्रमांत त्यांच्या सक्रिय सहभागाचे मान्यवरांनी कौतुक केले.

Related Articles

Check Also
Close