सातारा जिल्हाहोम

आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नामुळे नागझरीचा पाणीटंचाईचा दीर्घ प्रश्न सुटला

कराड/प्रतिनिधी : – 
कराड उत्तर मतदारसंघातील कोरेगाव तालुक्यातील नागझरी गावाचा पाणीटंचाईचा दीर्घ प्रश्न अखेर सुटला आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, अनेक आंदोलने व पाठपुराव्यांनंतरही न सुटलेला प्रश्न आमदार मनोज घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मार्गी लागला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच भाषणात घोरपडे यांनी नागझरी गावासाठी स्वतंत्र पाणीआरक्षणाची ठोस मागणी मांडली होती. त्यानंतर वेगाने हालचाली होऊन नागझरीसाठी 0.26 टीएमसी पाणी आरक्षित करण्याचा शासन निर्णय अखेर जाहीर झाला.
या निर्णयामुळे नागझरीतील नागरिकांमध्ये प्रचंड आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीर्घकाळ दुष्काळाचा सामना करणाऱ्या गावाची पाण्याची कायमस्वरूपी समस्या मिटणार असून, शेती व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात सुधारेल. घोरपडे यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत असून ग्रामस्थांनी आमदारांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या सहकार्याने कराड उत्तरमधील १२ उपसा सिंचन योजना मार्गस्थ झाल्याबद्दलही नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
नागझरीला कायमस्वरूपी पाणी मिळेल, अशी आशा ग्रामस्थांनी अनेक वर्षांपूर्वीच सोडून दिली होती. स्वतःच्या हिमतीवर जलसंधारणाची कामे करून पाण्याचा स्त्रोत वाढवण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करत होते. मात्र कराड उत्तरमध्ये ऐतिहासिक जनादेश देत घोरपडे आमदार झाल्यानंतर परिस्थितीत मोठे परिवर्तन झाले. गावाच्या मावळलेल्या आशांना नवे पंख मिळाले आणि आज त्या आशांना प्रत्यक्षात मूर्त रूप लाभले आहे. कामाचा माणूस आमदार झाल्यावर काय बदल घडू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे नागझरी, अशा शब्दांत ग्रामस्थ आणि पाणी संघर्ष समितीने समाधान व्यक्त केले.

Related Articles