सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची कृष्णा कॅम्पसला सदिच्छा भेट

कराड/प्रतिनिधी : –
राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी गुरुवारी कराडच्या कृष्णा कॅम्पसला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेत या आदर्शवत उपक्रमांचे कौतुक केले.
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले व सौ. गौरवी भोसले उपस्थित होते. कृष्णा बँकेच्या प्रधान कार्यालयातही मान्यवरांचे आतिथ्य करण्यात आले. यावेळी बँकेचे चेअरमन आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी, कृष्णा आर्थिक परिवाराच्या विविध कामकाजाची आणि प्रगतीची माहिती दिली.
कृष्णा बँकेने ग्राहकहिताला प्राधान्य देत अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवल्या असून, कर्जयोजनांमुळे अनेक उद्योजक व व्यावसायिकांना चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवत ग्राहकांना तंत्रसुलभ सेवा देण्याबाबत बँक कटिबद्ध असल्याचेही डॉ. भोसले यांनी नमूद केले.
कृष्णा हॉस्पिटलच्या अत्याधुनिक आरोग्यसेवा, कृष्णा विश्व विद्यापीठातील गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीच्या अनेक उपक्रमांची माहितीही मान्यवरांना देण्यात आली. सहकारमंत्री पाटील यांनी कृष्णा समूहाच्या बहुआयामी कार्याचे कौतुक करत संस्थेच्या उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील-वाठारकर, कृष्णा बँकेचे संचालक हर्षवर्धन मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव, जयवंतराव भोसले सहकारी पतसंस्थेचे संचालक वसीम मुल्ला, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, कृष्णा महिला पतसंस्थेचे व्यवस्थापक नितीन देसाई, वित्तपेटा मल्टिस्टेट सोसायटीचे व्यवस्थापक सुजीत माने, तसेच भाजपाचे राज्य परिषद सदस्य संजय पवार, मंडल अध्यक्ष शंकर निकम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.



