सातारा जिल्हाहोम

नारायणवाडीच्या सर्वांगीण विकासाला जिल्हास्तरीय पथकाची भेट 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला नवी गती

कराड/प्रतिनिधी : –

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सनियंत्रण व तपासणी पथक कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे दाखल झाले. गावात गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामस्थ, युवकवर्ग, महिला, बचतगट आणि ग्रामपंचायत यांच्या एकत्रित प्रयत्नातून राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करत पथकाने गावात प्रत्यक्ष स्थळभेट देऊन कामांची पाहणी केली.

ग्रामविकास अधिकारी श्री. माळी व प्रशासक श्री. बोलके यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील व विस्तार अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणवाडी गावाने विकासाच्या दिशेने उल्लेखनीय पावले उचलली आहेत. विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणपूरक व सार्वजनिक हिताचे उपक्रम राबविल्यामुळे नारायणवाडीने जिल्ह्यात ५० वे व कराड तालुक्यात ६ वे स्थान मिळवले असून, लवकरच जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे.

सायंकाळी या गावाला सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देत, ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या अभियानाशी संबंधित प्रकल्पांची तपशीलवार माहिती घेवून मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थांचा, विशेषतः महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला.

तपासणी व मार्गदर्शन पथकामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी गौरव चक्के, प्रकल्प संचालक विश्वास सिद, कार्यकारी अभियंता अमर नलावडे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, बांधकाम उपभियांता प्रताप पवार, उपअभियांता जयदीप पाटील, तसेच महिला व बालकल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी निलेश पवार यांचा सहभाग होता.

अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत विविध प्रकल्पांची प्रगती, योजनांची अमलबजावणी, आराखडे आणि आगामी कामांना गती देण्यासाठी दिशादर्शन केले. ग्रामस्थांशी संवाद साधत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक सूचनाही देण्यात आल्या.

ही भेट नारायणवाडीच्या विकास प्रक्रियेला नवी दिशा आणि ऊर्जा देणारी ठरल्याचे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles