आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

सरकारने तयारी नसताना निवडणुका घाईगडबडीने का घेतल्या? – पृथ्वीराज चव्हाण

कराड/प्रतिनिधी : –

राज्यात घटना दुरुस्ती धाब्यावर बसवून दहा वर्षे निवडणुका रखडवणाऱ्या सरकारने आता २० नगरपालिकांच्या निवडणुका थेट आदल्या दिवशी पुढे ढकलून अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली आहे. तयारी नसताना निवडणुका घाईगडबडीने का घेतल्या? असा सवाल उपस्थित करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पोरखेळ करून लोकशाहीची पायमल्ली करण्यात आली असून, याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते अजितराव पाटील–चिखलीकर, शहराध्यक्ष ॲड. अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील उपस्थित होते.

ते म्हणाले, निवडणूक आयोग निपक्षपाती असायला हवी. परंतु आज ती पूर्णपणे मोदी सरकारची झाली आहे. राहुल गांधी यांनी बोगस मतदानाचे पुरावे दिल्यानंतरही आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. घटना बदलण्याऐवजी हे सरकार घटनात्मक पदांवर बसलेल्यांना मॅनेज करते.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात तब्बल 48 हजार दुबार मतदार असल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला. या मतदारांची बूथनिहाय यादी आपल्याकडे असून, ही नावे लगतच्या इस्लामपूर, कराड उत्तर, पाटण, शिराळा, पलूस–कडेगाव मतदारसंघातही असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्नी पक्षाच्या आदेशानुसार निम्म्या पराभूत उमेदवारांनीही हायकोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. मीही कराड दक्षिणमधून याचिका दाखल केली आहे. माझ्यावर अन्याय झाला असून, जनताच मला न्याय देईल. न्यायालयाकडून अपेक्षा नाही, पण सत्य परिस्थिती समोर येण्यासाठीची माझी लढाई आहे. याबाबतच्या सुनावणीत आपण न्यायालयासमोर आपली बाजू मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दक्षिण मतदारसंघात दोनदा मतदान केलेल्यांवर कारवाई करावी, दुबार नावे काढून टाकावीत. या प्रश्नावर कराडमध्ये आंदोलन करणाऱ्या गणेश पवार यांच्या धाडसी पावलाचे त्यांनी कौतुकही केले. तसेच विधानसभा निवडणुका चोरल्या असल्याचा सरकारवर आरोपही त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, इतके भ्रष्ट सरकार महाराष्ट्रात कधी आले नव्हते. मोठे उद्योग राज्यात येण्यास तयार नाहीत. डिसेंबर-जानेवारीत पास होणाऱ्या मुलांना नोकऱ्या मिळणार नाहीत, एआयमुळे गंभीर बेरोजगारी उभी राहील. लाखो मुलं बेकार होतील. महाराष्ट्रात दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र सरकारचे लक्ष केवळ कॉन्ट्रॅक्ट देणे आणि कमिशन घेणे, यावरच आहे.

कराड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोट्यवधींचा निधी दिल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी 325 कोटी दिल्याचे सांगितले, पण कामांसाठी एकाही रुपया आल्याचे दिसले नाही, अशी टीका त्यांनी केली. स्टेडियमवर व्यायामासाठी येणाऱ्या लोकांना कोणतीही पर्याय न देता मैदान बंद केल्याने लोकांची गैरसोय झाली. पाटण कॉलनीतील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रर्यायी जागेचा प्रस्ताव लोकांना दिला होता, मात्र त्यांनी तो नाकारला. मात्र टीका करणाऱ्यांनी दीड वर्षांत काय काम केले ते सांगावे. जनतेला समजते कोण काम करतंय आणि कोण फक्त बोलतंय, असे विधान करत त्यांनी अतुल भोसले यांचे नाव न घेता टोला लगावला.

नामदेवराव पाटील म्हणाले, पाटण कॉलनीतील खुली जागा ही पार्किंग आरक्षणातील असल्याने ती कोणालाही बदलता येत नाही. येथील लोकांना अन्यत्र पुनर्वसनाचा पर्याय दिला होता, परंतु त्यांना या ठिकाणीच घरे हवी आहेत. मात्र या आरक्षणात बदल करून पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील त्यांना घरे बांधून देऊ शकत नाहीत, असा उल्लेख त्यांनी केला. दुबार मतदानावरील हरकतींची मुदत संपली असून, मतदानाच्या दिवशी दुबार नावांवर फुली मारून देण्यात येतील, असे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितल्याचे पाटील यांनी नमूद केले.

काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून येईल

कराड नगरपालिकेची निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस  पक्षाच्या चिन्हावर लढवली जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे. काँग्रेसचे जाकिर पठाण हे  नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील, असा विश्वास श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.

Related Articles