सातारा जिल्हाहोम

‘मी कराडचा आणि कराड माझे’ आघाडीचा नारा 

बाळासाहेब पाटील; लोकशाहीर व यशवंत आघाडीच्या प्रचाराची सांगता  

कराड/प्रतिनिधी : –

कराड शहराच्या ऐतिहासिक आणि प्रगत वाटचालीला नवीन गती देण्यासाठी “मी कराडचा आणि कराड माझे” या भावनेतून लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी एकत्र येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

येथील नामदेव चौकातील नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य सांगता सभेत ते बोलत होते. सभेस नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव, शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, नंदकुमार बटणे, जयवंत पाटील, हणमंत पवार, विद्याराणी साळुंखे, सौरभ पाटील, फारूक पटवेकर, राजेंद्र माने आदींसह आघाडीतील सर्व उमेदवारांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, कराडला दिशा देणारे पुरोगामी नेतृत्व म्हणजे स्व. यशवंतराव चव्हाण आणि पी. डी. पाटील. त्यांच्या दूरदृष्टीतून पाणीपुरवठा, ड्रेनेज, समाधीस्थळ असे अनेक मूलभूत विकासकामे उभी राहिली. आज काही जण समाधीचे पुनर्जीवन करण्याच्या नावाखाली प्रसिद्धीचे राजकारण करतात. शहराचा विकास राजकारणासाठी नव्हे तर कराडच्या अस्मितेसाठी झाला पाहिजे.

ते म्हणाले, सात दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच पी. डी. पाटील कुटुंबातील एकही सदस्य निवडणुकीत नाही, सर्वांना समान संधी देण्याच्या मूल्यांवरच आघाडी उभी आहे. राजेंद्रसिंह यादव यांनी शहरासाठी मोठा निधी आणला असून, पालकमंत्री काळात मीही 35 कोटींचा निधी दिला आहे. आघाडीला सत्ता मिळाल्यानंतर नियोजनबद्ध विकास दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, पी. डी. पाटील साहेबांनी यशवंतराव चव्हाण साहेबांचे समाधीस्थळ उभारले, ते राज्यासाठी प्रेरणास्थान आहे. समाधी उभारणीसाठी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी सहकार्य केले, शरद पवार साहेबांनीही मदत केली. मात्र काही लोक आज त्या समाधीचे पुनर्जीवन करण्याच्या वल्गना करतात. मात्र ते करताना त्या समाधीचे महात्म्य, पावित्र्य राखले गेले पाहिजे. पी. डी. पाटील साहेबांनी समाधीस्थळ व अन्य गोष्टी उभारताना कोठेही नावाचा उल्लेख केला नाही. मात्र फक्त नावासाठी कुणी काही करत असेल तर, कृपा करून ते करू नये, अशी विनंती बाळासाहेब पाटील यांनी केली.

राजेंद्रसिंह यादव म्हणाले, कराडच्या शाश्वत विकासासाठी आम्ही राजकारण बाजूला ठेवून कृष्णा आणि कोयनेप्रमाणे एकत्र आलो आहोत. विरोधक भावनिकतेचे राजकारण करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. पण मतदारांनी कराडच्या अस्मितेसाठी, शांततामय सहजीवनासाठी मतदान केले पाहिजे.

विदूषकांच्या हाती सत्ता गेली तर, शहर सर्कस बनेल. तुमची एक चूक पाच वर्षे महागात पडेल. प्रशासकीय आणि अडचणीच्या काळात तुमच्यासाठी कोण धावून आलं, हेही तुम्ही लक्षात ठेवा. ही निवडणूक जनतेने हातात घ्यावी, योग्य हातात चावी द्या, असे आवाहन करून यादव यांनी विकासनिष्ठ भूमिकेला मतदारांची साथ मागितली.

यावेळी शरद कणसे, जयवंत शेलार, जयवंत पाटील, हणमंत पवार, फारूक पटवेकर यांनीही मनोगत व्यक्त करून आघाडीची एकजूट आणि भविष्यातील विकास आराखडा मांडला.

Related Articles