कराडच्या भविष्यासाठी पावसकरांना विजय करा-फडणवीस

कराड / प्रतिनिधी : –
कराडच्या सर्वांगीण विकासासाठी विनायक पावसकर (आण्णा ) व त्यांच्या टीमला पालिकेत विजय पताका घेऊन पाठवा असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील दत्त चौकात भारतीय जनता पार्टीच्या कराड व मलकापूर नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेचे बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार अतुल बाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, कृष्णा कारखान्याचे चेअरमन सुरेश भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, नीता केळकर, भरत पाटील, मकरंद देशपांडे, विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ, सुहास जगताप, कराड नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक पावसकर व मलकापूरचे तेजस सोनवणे, शारदा जाधव, मनोहर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
ते म्हणाले, कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराशेजारील झोपडपट्टीसह कराड शहरातील 11 आणि मलकापुरातील 3 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करून कराड आणि मलकापूरला झोपडपट्टी मुक्त शहरं करू. तसेच आतापर्यंत यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळाचे रिडेव्हलपमेंट करण्याचे स्वप्न अतुलबाबांनी पाहिले, ते प्राधान्याने पूर्ण करू. त्यांच्या मागणीनुसार अत्याधुनिक शिवाजी स्टेडियमच्या निर्मितीसाठी 96 कोटींचा निधी दिला आहे. खाशाबा जाधव स्मारकासाठी 25 कोटी, कराड – विटा महामार्ग, पंचायत समिती इमारत, रस्ते, जोडरस्त्यांसाठी तब्बल 400 कोटी, आंबेडकर वाचनालय, पाणीपुरवठा योजना यांसह अन्य विकासकामांच्या माध्यमांतून कराड शहरात मोठे परिवर्तन झालेले दिसेल. हे सर्व नगरपालिकेला जपणारे काम नाही. मात्र अतुल बाबा मोठे स्वप्न पाहणारे नेते आहेत, त्यांची सर्व स्वप्न मी पूर्ण करू, कराड ही छत्रपती शिवरायांचा इतिहास लाभलेली भूमी आहे. या ठिकाणी २०१६ मध्ये मी कराडचा नगराध्यक्ष निवडून देण्याचे आवाहन केले होते, ते तुम्ही पूर्ण केले. सत्यकाळात अनेक विकासकामे करण्याचा प्रयत्न केला.



