कराडच्या सर्वांगीण विकासाचा महाअजेंडा; विनायक पावसकरांचा (आण्णा )भव्य जाहीरनामा जाहीर

कराड / प्रतिनिधी :-
कराड शहराला आधुनिक, सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट रूप देण्याच्या निर्धाराने भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व ज्येष्ठ नेते विनायक पावसकर यांनी आपला व्यापक जाहीरनामा जाहीर केला. कराडच्या सर्व क्षेत्रांचा समावेश असलेल्या या जाहीरनाम्यामुळे शहरात नव्या विकासदृष्टीची चर्चा रंगली आहे.
पावसकर यांनी शहरात स्मार्ट पायाभूत सुविधा उभारण्याचा संकल्प केला आहे. खड्डेमुक्त डांबरी रस्ते, आकर्षक चौक, फूटपाथ, स्मार्ट स्ट्रीटलाईट्स आणि भूमिगत वायरिंगद्वारे कराडला आधुनिक स्वरूप देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. स्वच्छ कराड–सुंदर कराड या मोहिमेखाली घराघरातून ओला व सुका कचरा वेगळा संकलन, स्वच्छता व्यवस्था मजबुतीकरण आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांचे उन्नतीकरण यावर भर देण्यात आला आहे.
शहराला २४ तास पाणीपुरवठा मिळण्यासाठी गळती रोखणे, पाणी पुनर्वापर प्रकल्प, पावसाच्या पाण्याची साठवण आणि प्रत्येक घरापर्यंत नियमित पाणी पोहोचवणे यांसाठी ठोस नियोजन करण्यात आले आहे. सुरक्षित कराड उपक्रमांतर्गत शहरभर सीसीटीव्ही नेटवर्क, वाहतूक नियंत्रण, महिला सुरक्षा पथके, रात्री गस्त आणि आधुनिक स्मार्ट मॉनिटरिंग सेंटर उभारण्याचा मानस आहे.
निरोगी कराड मोहिमेत नवीन नागरी आरोग्य केंद्रे, मोफत आरोग्य शिबिरे, डिजिटल हेल्थ आयडी आणि चांगल्या आरोग्यसेवेसाठी संस्थात्मक सहयोग या गोष्टींचा समावेश आहे. पर्यावरण संवर्धनावरही भर देत झाडे, उद्याने, मियावाकी जंगल निर्मिती, नदी स्वच्छता आणि पर्यावरणपूरक विकासाची दिशा जाहीरनाम्यात मांडण्यात आली आहे.
कराडला डिजिटल शहर बनवण्यासाठी नागरिकांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्रे, तात्काळ मंजुरी, ई-गव्हर्नन्स सेवा, तक्रार निवारण अॅप आणि पूर्ण डिजिटल प्रशासनाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शहरातील व्यापार आणि बाजारपेठांना नवसंजीवनी देण्यासाठी जुन्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे पुनर्विकास, भाजी मंडईचे अद्ययावत रूपांतर, पार्किंगसह सुव्यवस्थित बाजारपेठा आणि स्ट्रीट व्हेंडर झोन्सची व्यवस्था करण्याची योजना आहे.
युवकांसाठी स्टार्टअप मार्गदर्शन, कौशल्य विकास, क्रीडांगणे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि जॉब फेअर्स आयोजित करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. महिलांसाठी स्वयं-सहाय्य गटांना प्रोत्साहन, प्रशिक्षण कार्यक्रम, हेल्पलाईन सुविधा तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी सुसज्ज सार्वजनिक सोयी उपलब्ध करून देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
शिक्षणाच्या दर्जात वाढ करण्यासाठी नगरपालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट क्लासरूमने सुसज्ज करण्याबरोबरच डिजिटल लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि शिष्यवृत्ती योजना राबविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पर्यटन क्षेत्रातही नदीकाठ विकास, फूड स्ट्रीट, ऐतिहासिक स्थळांचे नूतनीकरण आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्याचा हेतू स्पष्ट करण्यात आला आहे.
शहरातील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक अग्निशमन साधने, पूरप्रतिबंधक उपाय, त्वरित प्रतिसाद पथके आणि आपत्कालीन यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरात तीन ते चार ठिकाणी अत्याधुनिक मल्टी-लेव्हल पार्किंगची उभारणी करण्याची घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.
गृहनिर्माण क्षेत्रात परवडणारी घरे, झोपडपट्टी सुधारणा, स्वच्छ नाले आणि उत्तम जीवनमान या गोष्टींवर भर देण्यात आला आहे. प्रधानमंत्री सूर्य घर आणि महाराष्ट्र SMART सौरऊर्जा योजनांच्या माध्यमातून घरगुती ग्राहकांना वीज बिलात बचत होईल, यासाठी सौरऊर्जा प्रकल्पांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्यात येणार आहे. शहरातील सार्वजनिक इमारतींमध्येही सौरऊर्जेची स्थापना करण्याचे ध्येय पावसकर यांनी व्यक्त केले.
कराडच्या सर्व प्रभागांमधील ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे भूमिगत करण्याची मोठी घोषणा करून शहराला सुरक्षित आणि आकर्षक स्वरूप देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पावसकर यांच्या या जाहीरनाम्यात कराडच्या सर्वांगीण विकासाचे विस्तृत चित्र मांडण्यात आले असून नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याची हमी देण्यात आली आहे.



