कराड नगरपालिकेत अपक्षांचा तिसरा पर्याय देणार – रणजीत पाटील

कराड/प्रतिनिधी : –
शिवसेनेकडून ऐनवेळी ए.बी. फॉर्म आणि धनुष्यबाणाचे चिन्ह न मिळाल्याची याची खंत आहे. त्यामुळे अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी दिली आहे. तसेच प्रभागातील समविचारी अपेक्षांचा पालिकेत नवा पर्याय देणार आहे. १२ जण आपल्या संपर्कात आहेत. अपक्षांच्या या पर्यायाला मतदार साथ देतील, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते व नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार रणजीत पाटील यांनी व्यक्त केला.
कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून लढा देत असून, अन्य अपक्ष उमेदवारांची मोट बांधून निवडणुकीस सामोरे जात असल्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रभागातील पाच अपक्ष उमेदवार उपस्थित होते.
रणजीत पाटील यांनी, या निवडणुकीत आपल्यासोबत ज्योती पवार, प्रताप इंगवले, शैला पाटील, विनायक मोहिते, वंदना गायकवाड व पूनम धोत्रे हे उमेदवार असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. त्यातून अनेक सार्वजनिक विकास कमी करता आल्याचे समाधान आहे. त्याच्या माहितीचे सेवापर्व नावाचे पुस्तक कराड मधील प्रत्येक नागरिकाच्या घराघरात वाटत आहोत. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निधातून झालेली कामे पुस्तक रूपात नागरिकांसमोर मांडत आहोत.
शंभूतीर्थ स्मारक ते स्मशानभूमी, वाखाण रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. अनेक सामाजिक उपक्रमात श्री. शिंदे यांनी प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर कराड पालिका निवडणुकांना सामोरे जाण्याचा मानस होता, मात्र काही कारणाने ते शक्य झाले नाही. आम्हाला शिवसेनेतून अर्ज भरायला सांगितले, त्यानुसार अर्जही भरले. मात्र एबी फार्म आमच्यापर्यंत येवू दिला नाही. यामागे कोणाचा प्रयत्न आहे, याचा खुलासा झाला नाही. मात्र राजकीय स्थितीमुळे पक्षाच्या वरिष्ठांनी तसा निर्णय घेतला असेलही, मात्र तरीही पालिका निवडणुकीत धनुष्यबाणाचे चिन्ह नाही, याची खंत वाटते.
कराड नगरपालिकेवर भगवा फडकला पाहिजे, अशी (स्व.) आनंद दिघे यांची इच्छा होती. १९९४ मध्ये ते कराडला आले असता, त्यांनी ही इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आम्हीही त्या पध्दतीने गांभीर्याने विचार करत आहोत. यावेळी शक्य ते झाले नाही, त्यामागे बरीच कारणे आहेत. मात्र भविष्यात ते स्वप्न आपण पूर्ण करून दाखवू. तूर्तास अपक्षांची मोट बांधत आहोत. शिवसेनाचाच विचार जोपासला जाईल. नगराध्यक्षपदासह प्रभागात आमच्याकडे येवू इच्छुणाऱ्या समविचारी लोकांची स्वतंत्र मोट बांधून नवा पर्याय देत आहोत, त्याला लोक पसंती देतील, अशी अपेक्षा आहे. आत्ता पाच, तर पुढच्या दोन दिवसात किमान १० वेगवेगळ्या प्रभागातील अपक्ष आमच्या सोबत येतील, याचा विश्वास त्यांनी आहे. तसेच सेवापर्व नावाचे पुस्तक दाखवून त्यातील प्रकल्पांची माहिती देत यात आणखीन नव्या योजना कल्पनांची भर घालणार असल्याचे रणजीत पाटील यांनी सांगितले.



