कराड व मलकापूर निवडणूक निरीक्षक पदी ज्योती कावरे यांची नियुक्ती

सुनील पाटील :-
कराड व मलकापूर नगरपालिका निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक , निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मा. विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडून निवडणूक निरीक्षक (ऑब्जर्वर) म्हणून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे च्या उपमहाव्यवस्थापक श्रीमती ज्योती कावरे यांची नियुक्ती झाली असून त्या आज सोमवारी कराड येथे दाखल झाल्या. त्या कराड व मलकापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या संपूर्ण निवडणूक कामकाजाची पाहणी करून माहिती व आढावा घेणार असल्याची माहिती कराड नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत व्हटकर यांनी दिली.
आज कराडात दाखल झाल्यानंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयास भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले.
त्या निवडणुक निकाल जाहीर होईपर्यंत कराड शहरात मुक्कामी राहून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर काटेकोरपणे देखरेख करणार आहेत. याशिवाय स्थानिक प्रशासन, पोलिस व निवडणूक कर्मचार्यांचे कामकाज तपासणे, मतदान केंद्रांची तयारी पाहणे, दिव्यांग सुविधा, पाणी, शौचालय, प्रकाश, सुरक्षा यांची उपलब्धता तपासणे. निवडणूक शुल्क व खर्चावर लक्ष ठेवणे तसेच उमेदवारांच्या निवडणूक खर्च वह्या तपासणे. वेगवेगळ्या टीमकडून मिळालेली खर्च माहिती पडताळणे. मतदान केंद्रांची पाहणी करणे.ईव्हीएम यंत्रांची तयारी, मॉक पोल तपासणे.पोलिंग पार्ट्यांच्या प्रशिक्षण व नियोजनावर नजर ठेवणे.
पोलिंग अधिकारी, बीएलओ व इतर कर्मचार्यांचे प्रशिक्षण याची पडताळणी करणे. साहित्य वितरण आणि परतावा प्रक्रिया तपासणे. मतदान केंद्राच्या संवेदनशीलतेनुसार सुरक्षा बंदोबस्त तपासणे. जोखीम असलेल्या भागात पोलिस तैनाती व गस्त यांचे निरीक्षण करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची खात्री करणे. राजकीय पक्षांच्या सभा, प्रचार, वाहन तालिका, ध्वनीप्रदूषण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते का हे पाहणे व कोणतेही उल्लंघन झाल्यास मा. राज्य निवडणूक आयोगास अहवाल सादर करणे.मतदान केंद्रांना भेट देणे.कोणताही तणाव, बोगस मतदान, दबाव आदी बाबी आढळल्यास कारवाईचे आदेश देणे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरळीत चालते का ते पाहणे. नागरिक, उमेदवार व पक्षांकडून आलेल्या तक्रारी ऐकून त्यांचे निवारण करणे. निवडणूक आयोगास दैनंदिन अहवाल पाठवणे. निवडणुकीनंतर अंतिम अहवाल सादर करणे. मतमोजणी केंद्राची व्यवस्था, सुरक्षा, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन यांचे निरीक्षण करणे. ईव्हीएम, सील तपासणी यासह इतर आवश्यक व महत्त्वाच्या कामकाजांवर त्या लक्ष ठेवून कामकाज पाहणार आहेत.


