कराड–मलकापूरमध्ये ‘अतुलबाबा इफेक्ट’! भाजपमध्ये इनकमिंगची मोठी लाट
नगरपालिका निवडणुकीत भाजप आघाडीवर; विरोधी गटात चलबिचल

कराड / प्रतिनिधी : –
कराड दक्षिणमध्ये मोठा विजय मिळवत इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आल्याने सत्ताधारी पक्षात मोठे इनकमिंग सुरू झाले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा हा करिष्मा असून, त्यांच्या नेतृत्वाला मान्यता देत कराड आणि मलकापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी भाजपची ताकद चांगलीच वाढल्याने पक्ष वरचढ ठरला आहे.
आमदार अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मानणाऱ्या कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्यासह आघाडीच्या अनेक आजी-माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कराडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे एक निकटवर्तीय नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झाले असून, अतुलबाबांनी बाळासाहेब पाटील यांनाही शह दिला आहे.
तसेच पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष आणि मलकापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनीही अतुलबाबांच्या उपस्थितीत भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, नुकतेच माध्यमांशी बोलताना आमदार अतुलबाबा भोसले यांनी इनकमिंगचा आकडा वाढणार असल्याचे सांगितल्याने विरोधी गटात चलबिचल निर्माण झाली आहे.
दरम्यान, कराडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी खुले आरक्षण पडल्याने अनेकांनी दंड थोपटले आहेत. तसेच अनेक प्रभागांमध्ये आरक्षण फेरबदल झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. या सर्वांचा मेळ घालण्याचे आव्हान आमदार अतुलबाबा भोसले यांच्यासमोर आहे.
इनकमिंगमुळे भाजपमध्येच धुसफूस
मलकापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मनोहर शिंदे यांच्या एककल्ली अंमलामुळे नाराज झालेले त्यांचे समर्थक राजेंद्र यादव व सहकाऱ्यांचा गट भाजपमध्ये सामील झाला आहे. असे असताना, दस्तुर खुद्द मनोहर शिंदे स्वतः त्यांच्या इतर समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाल्याने या अनपेक्षित इनकमिंगमुळे भाजपच्या गोटात धुसफूस सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या माल्कापुरातील भाजपच्या मेळाव्यात अतुलबाबांनी शहराच्या विकासासाठी सर्वांनी मागेपुढे सरकण्याची तयारी दर्शवावी, आपण जुन्या-नव्यांचा मानसन्मान राखू, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
उंडाळकर गटही मलकापूरच्या रिंगणात
मलकापूर नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे नेते उदयसिंह पाटील – उंडाळकर हेही उतरले असल्याने या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे. या ठिकाणी समविचारी लोकांसोबत आपण या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे याचा “फायदा – तोटा” नक्की कोणाला होणार! हे पाहणेही औचित्याचे ठरणार आहे.



