कराडमध्ये भाजपची शक्तीप्रदर्शन पदयात्रा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभाग ८ मध्ये भाजपची मोर्चेबांधणी मजबूत; पदयात्रेत विजयी संकल्प

कराड / प्रतिनिधी :-
कराड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रभाग क्रमांक ८ मधील बटाणे गल्ली परिसरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या पदयात्रेला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साथ दिली.
या पदयात्रेत प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार सौ.किशोरी अतुल शिंदे, उमेदवार विजय पांडुरंग वाटेगावकर, भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायकअण्णा पावसकर तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे आमदार डॉ.अतुलबाबा भोसले, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, युवा नेते अतुल शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधला. नागरिकांच्या मूलभूत गरजा, पायाभूत सुविधा, रस्त्यांची दुरवस्था, नळ-पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, सुरक्षिततेचे प्रश्न आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाविषयी व्यक्त झालेल्या अपेक्षा त्यांनी मनापासून जाणून घेतल्या.
नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक अडचणीचा गांभीर्याने विचार करून प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्याचा भाजपा उमेदवारांनी ठाम निर्धार व्यक्त केला. बटाणे गल्लीसह संपूर्ण प्रभाग क्रमांक ८ ला स्वच्छ, सुंदर आणि अत्याधुनिक सुविधा प्राप्त करून देणे हा केवळ आश्वासक शब्द नसून भाजपच्या कार्यकर्तृत्वाची प्रत्यक्ष साक्ष असल्याचे उमेदवारांनी सांगितले. कराडच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक काम करण्याची भाजपची परंपरा असल्याचा विश्वास त्यांनी मतदारांना दिला.
पदयात्रेत सहभागी झालेल्या कराड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मधील नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार विनायक पावसकर (अण्णा) यांनी प्रभागातील सर्व नागरिकांशी संवाद साधत भाजपा उमेदवारांना मोठ्या बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. आगामी पाच वर्षांत कराड शहराला आधुनिक, सुरक्षित आणि सुजलाम-सुफलाम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
भाजपच्या पदयात्रेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये निवडणुकीची लढत अधिक रंगतदार झाली आहे. मतदारांनी ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून भाजपा उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन यावेळी उमेदवारांनी केले.



