मलकापूरच्या विकासासाठी कमळ हातात घेणार
मनोहर शिंदे यांची भूमिका; पक्षप्रवेशाची तारीख व वेळ पक्षनेते जाहीर करतील

कराड/प्रतिनिधी : –
केंद्र व राज्यात काँग्रेसचे सरकार असल्याने मलकापूर शहराचा विकास झाला. यात काँग्रेस पक्षासह पृथ्वीराज चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. परंतु, अजूनही येथील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे सध्या केंद्रात आणि राज्यात सरकार असलेल्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची भूमिका मनोहर शिंदे यांनी स्पष्ट केली.
आपली राजकीय भूमिका जाहीर करण्यासाठी कराडचे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मलकापरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येगडे यांच्यासह आजी-माजी नगरसेविका व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण भाजपमध्ये जाणार आहात का? या प्रश्नावर त्यांनी मी माझी भूमिका आपणासमोर मांडली आहे. प्रत्यक्ष पक्षप्रवेशावेळी या गोष्टी स्पष्ट होतील, असे त्यांनी सांगितले.
आपल्या २५ वर्षांच्या वाताचालीत मलकापूर ग्रामपंचायती, नगरपंचायत ते नगरपालिका इथपर्यंतच्या वाटचालीचा शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी माजी मंत्री स्व. यशवंतराव मोहिते, विलासकाका पाटील-उंडाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि माजी आमदार स्व. भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूरचा विकास झाल्याचे त्यांनी सांगितले. देशात प्रथम २४ बाय सात पाणीपुरवठा योजना स्व. भास्करराव शिंदे यांनी राबवल्याचे त्यांनी नमूद करत ही योजना आजही देशात आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या, लोकसंख्या वाढीमुळे शहरात अनेक समस्यांही निर्माण झाल्या आहेत. आपल्याला आत्तापर्यंत साथ दिलेल्या लोकांसह शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मूळ प्रवाहात येण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने आपण भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली., यावेळी त्यांनीही विकासाच्या मूळ प्रवाहात येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या निर्णयाचे स्वागत करून लोक पुन्हा आपल्याला संधी देखील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांचा विरोध पाहता आपणास पक्षात अपेक्षित स्थान मिळेल का? या प्रश्नांवर आतापर्यंत मी ज्या ठिकाणी काम केले, त्या ठिकाणी शहरांसह नागरिकांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून प्रयत्नशील राहिलो, आताही माझी तीच भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष पदासंदर्भात विचारल्यावर, याबाबत पक्षाचे नेते आमदार अतुलबाबा भोसले निर्णय घेतील, असे सांगत ते विकासकामांसाठी सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.
विधानसभा प्रचारावेळी घटनाबाह्य सरकार म्हणून टीका करणाऱ्या महायुतीतील भाजपात तुम्ही जात आहात? या प्रश्नावर त्यांनी आपण असे वक्तव्य केले नसल्याचे सांगत वेळ मारून गेल्याचे दिसून आले. तसेच नव्या पक्षाची विचारधारा स्वीकारणे; हे माझे कौशल्य राहील, असेही त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर आपणास इडीची नोटीस आल्यानेच तुम्ही हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यावर त्यांनी, याबाबत जे लोक असे म्हणत असतील, त्यांनाच विचारा. अशी नोटीस आली असेल तर, त्यांनी ती जाहीर करावी, असे आव्हानही त्यांनी संबंधितांना दिले. तसेच भारतीय जनता पार्टीत जाण्याची भूमिका केवळ माझ्या हितासाठी नसून, ती मलकापूर शहरासह नागरिकांच्या विकासासाठी असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा नमूद केले. त्याचबरोबर पक्षप्रवेशाची तारीख आणि वेळ ठरली आहे का? यावर हे पक्षनेते अतुलबाबा भोसले जाहीर करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.



