सातारा जिल्हाहोम

नारायणवाडीचा आदर्श उपक्रम, एकात्मतेचा संदेश आणि समाजसेवेचा संकल्प!

मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : –

कराड तालुक्यातील नारायणवाडी हे गाव सामाजिक एकात्मता आणि जनसेवेच्या उपक्रमांमुळे आदर्श ठरत आहे. कै. रा. की. लाहोटी लायन्स चॅरिटेबल आय हॉस्पिटल यांच्या वतीने नारायणवाडी विकास सोसायटी येथे दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिराचे आयोजन ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कराड, मानव अधिकार कराड व वनवासी कल्याण आश्रम सदस्य नितीन शाह यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत डोळे तपासणी करण्यात आली, तसेच गरज असलेल्या रुग्णांना अल्प खर्चात मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

या शिबिरामुळे अनेक ग्रामस्थांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण मदत मिळाली. या प्रसंगी नारायणवाडी विकास सोसायटीचे चेअरमन श्री. कृष्णात यादव, माजी चेअरमन प्रमोद हरदास, सचिव संजय कारंडे, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत माळी, विकास सोसायटीचे सर्व संचालक तसेच कालेटेक व मुनावले गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

विशेष म्हणजे, नारायणवाडीतील ज्येष्ठ नागरिकांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका बिनविरोध पार पाडण्याचा संकल्प केला असून, त्याची सुरुवात विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध करून करण्यात आली आहे. हा उपक्रम गावाच्या एकात्मतेचा आणि सुजाणतेचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे.

गावातील महिला सक्षमीकरण, ‘लखपती दीदी’ अभियान, वृक्षारोपण, व विविध समाजाभिमुख उपक्रमांद्वारे नारायणवाडी स्वच्छ, समृद्ध आणि आदर्श गावाकडे वाटचाल करीत आहे.

Related Articles