कृष्णा फाउंडेशन कॅम्पसमध्ये ‘वंदे मातरम् गौरव सामूहिक गायन

कराड/प्रतिनिधी : –
येथील कृष्णा फाउंडेशन कॅम्पसमध्ये देशभक्तीची प्रेरणा जागविणारा ‘वंदे मातरम् गौरव सामूहिक गायन’ हा प्रेरणादायी कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. ‘वंदे मातरम्’ या ऐतिहासिक गीताच्या १५० वर्षपूर्तीच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात विविध मान्यवरांसह विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या सर्वांनी एकत्रितपणे ‘वंदे मातरम्’चे गायन करत एकता, राष्ट्रप्रेम आणि भारतीय संस्कृतीचा अद्भुत संगम अनुभवला.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, प्रदेश संघटनमंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार आनंदराव पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करुन, ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करण्यात आले. तसेच यावेळी स्वदेशीची शपथही घेण्यात आली.
याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. भोसले म्हणाले, ‘वंदे मातरम्’ हे गीत केवळ काव्य नव्हे, तर भारतीय स्वातंत्र्य संघर्षाला दिशा देणारा आत्मश्वास आहे. स्वातंत्र्याच्या प्रत्येक लढ्यात, क्रांतिकारकांच्या प्रत्येक घोषणेत, सत्याग्रहाच्या प्रत्येक मिरवणुकीत हे गीत प्रेरणेचा दीप बनले. आज आपण स्वातंत्र्याचा, संविधानाचा आणि लोकशाहीचा श्वास घेतो आहोत, कारण त्या काळातील युवकांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि क्रांतिकारकांनी या गीताने प्रेरित होऊन त्याग केला, संघर्ष केला. आजच्या काळात राष्ट्र प्रथम ही भावना केवळ कार्यक्रमापुरती न बाळगता, आयुष्यभर जपण्याची शपथ सर्वांनी घ्यायला हवी.
यावेळी आ.मनोज घोरपडे, मकरंद देशपांडे यांचीही भाषणे झाली. यावेळी पक्षाच्या नेत्या डॉ. प्रियाताई शिंदे, चित्रलेखा माने – कदम, युवा नेते याज्ञीसेन पाटणकर, कराडच्या माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, माजी नगरसेवक अरुण जाधव, इंद्रजीत गुजर, शिवाजीराव पवार, माजी नगरसेविका स्मिता हुलवान, पैलवान धनंजय पाटील, सुवर्णाताई पाटील, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, तालुकाध्यक्ष राजेंद्र यादव, हर्षवर्धन मोहिते, संजय पवार, आर.टी. स्वामी, सूरज शेवाळे, डॉ. सारिका गावडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



