सातारा जिल्हाहोम

ऊसदर वाढवण्याच्या मागणीसाठी साकुर्डी येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको 

कराड/प्रतिनिधी : –

ऊसदर वाढवण्याच्या मागणीसाठी तांबवे फाटा (साकुर्डी), ता. कराड येथे शुक्रवारी विविध शेतकरी संघटनांनी तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, पहिला हप्ता ३७५० रुपये देण्यात यावा आणि साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासण्यात यावेत, या मागण्यांवरून शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. यामुळे जवळपास अर्धा तास कराड–पाटण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष व प्रहार संघटना यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या दबावामुळे दोन तास ऊसाने भरलेले ट्रॅक्टर कारखान्याकडे रवाना झाले नाहीत.

याप्रसंगी बोलताना शेकापचे अ‍ॅड. समीर देसाई म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून ऊसाला योग्य दर मिळालेला नाही. एफआरपी धोरणात बदल करणे काळाची गरज आहे. 1955 मध्ये साखर जीवनावश्यक वस्तूंमध्ये धरली होती, मात्र आज देश साखरेत स्वावलंबी आहे. १७ टक्के साखर घरगुती तर ८३ टक्के औद्योगिक वापरासाठी जाते. त्यामुळे सरकारने औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी वेगळे दर ठरवावेत, अशी मागणी त्यांनी केली.

बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव म्हणाले, या हंगामात ऊसाला चार हजार रुपये दर मिळालाच पाहिजे. मागील हंगामातील २०० रुपये बाकी रक्कम कारखानदारांनी तत्काळ द्यावी. प्रत्येक कारखान्याचे वजनकाटे तपासले गेले पाहिजेत. शेतकरी एकत्र राहिले तर कारखानदारांना न्याय्य दर द्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले.

या आंदोलनात रासपचे कार्याध्यक्ष महेश जिरंगे, अरुण डुबल, हैबतराव पवार, भाई सावंत, संभाजीराव जाधव, मनोज हुबाळे, डॉ. देशमुख, संदीप साळुंखे, उन्मेश देशमुख, शुभर उबाळे, महेश निकम यांच्यासह शेकाप, बळीराजा शेतकरी संघटना आणि रासपचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Related Articles