सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन व मेस्को माजी सैनिकांकडून शंभूराज देसाई यांचा सन्मान

कराड/प्रतिनिधी : –
माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी माजी सैनिकांच्या मासिक वेतनातील तफावत दूर करण्याचे आदेश तत्काळ देत सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल त्यांचा सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन व मेस्को माजी सैनिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
अलीकडेच सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या प्रतिनिधींनी मंत्री शंभूराज देसाई यांना महाराष्ट्र माजी सैनिक कल्याण महामंडळ (मेस्को) मध्ये सुरक्षा रक्षक आणि गार्ड म्हणून कार्यरत असलेल्या माजी सैनिकांच्या मासिक वेतनातील तफावत दूर करण्याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनाची गंभीर दखल घेत मंत्री देसाई यांनी २७ ऑक्टोबर रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह येथे संबंधित अधिकारी व सचिवांची बैठक बोलावली. यावेळी त्यांनी तफावत तात्काळ दूर करून माजी सैनिकांना सन्मानजनक वेतन देण्याचे निर्देश दिले.
या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत कदम, सुभेदार नि. जगन्नाथ मोहिते (सातारा जिल्हा माजी सैनिक महामंडळ मेस्को सुपरवायझर) यांच्या हस्ते मंत्री देसाई यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सैनिक फेडरेशनच्या वतीने मंत्री देसाई यांच्या निर्णयाचे स्वागत करत प्रशांत कदम यांनी, माजी सैनिकांच्या सन्मानासाठी सरकारकडून झालेली ही कार्यवाही प्रेरणादायी आहे. यामुळे राज्यातील हजारो माजी सैनिकांचा आत्मविश्वास वाढेल, असे मत व्यक्त केले.
यावेळी माजी सैनिक प्रशांत कदम, सुभेदार नि. जगन्नाथ मोहिते, सुभेदार नि. हनुमंत मोहिते, वीरेंद्र अकॅडमीचे अध्यक्ष विजय पवार, माजी सैनिक संतोष सावंत, गोरख साळुंखे, सचिन थोरवे, अशोक साळुंखे, आबा जानकर, लक्ष्मण संकपाळ तसेच अनेक माजी सैनिक, शहीद जवानांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती.
				


