कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘रन फॉर युनिटी’ या देशव्यापी उपक्रमाचा एक भाग म्हणून कराड शहरात सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी एकता दौड उत्साहात पार पडली.
शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता येथील सौ. वेणूताई चव्हाण स्मारक येथून या दौडीला प्रारंभ झाला. तर शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून दौडचा समारोप झाला.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रमुख उपस्थित होते. तसेच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष पै. धनाजीराव पाटील, माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर, राजेंद्र उर्फ आप्पा माने, स्मिता हुलवान, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘रन फॉर युनिटी’ उपक्रमाचे राष्ट्राची अखंडता, ऐक्य आणि बंधुभाव दृढ करणे हे उद्दिष्ट असून, देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. दौडदरम्यान “एक भारत श्रेष्ठ भारत”, भारत माता की जय, वंदे मातरम्” अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमले. युवा वर्ग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.
याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, ऐक्यातून देशाची प्रगती व्हावी, नागरिकांमध्ये सद्भावना टिकावी, हा ‘रन फॉर युनिटी’ या उपक्रमामागचा खरा उद्देश आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी ५६५ संस्थानांना एकत्र आणून अखंड भारत घडविला. जात, धर्म, प्रांत यापलीकडे जाऊन देश एकसंध ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या विचारांना उजाळा देत भावी पिढी त्यांच्या तत्त्वांवर चालावी, हा आमचा प्रयत्न आहे. कराडसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
 
				


