सातारा जिल्हाहोम

अतुलबाबांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये दिग्गजांचा पक्षप्रवेश

कराड/प्रतिनिधी : –

जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून जनशक्ती आघाडीच्या प्रभावशाली नेतृत्वाने भारतीय जनता पक्षात प्रवेश करून कराडच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवला आहे. अतुलबाबांनी कराडमध्ये काही शिल्लकच ठेवले नाही. मलकापुरातही हीच परिस्थिती असल्याने आता कराड आणि मलकापूर या दोन्ही नगरपालिका भाजपच्या ताब्यात येतील, असा ठाम विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात झालेला हा प्रवेश सोहळा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ना. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यामध्ये कराडच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती शारदाताई जाधव, जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष माजी नगरसेवक अरुण जाधव, उपाध्यक्ष माजी नगरसेवक अतुल शिंदे, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक शिवाजीराव पवार, माजी नगराध्यक्ष अशोक भोसले, स्व. जयवंतराव जाधव यांचे चिरंजीव डॉ. आशुतोष जाधव, माजी नगरसेवक आनंदराव पालकर, तसेच सौ. चंदाराणी लुणीया, विनायक विभुते, श्रीमती अरुणा शिंदे, रमेश लुणीया यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

याप्रसंगी बोलताना ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपला शंभर वर्षांचे भवितव्य आहे, बाकीचे सर्व बुडबुडे आहेत. भाजपमध्ये जनतेचा कल सातत्याने वाढत असून, कराडसारख्या महत्त्वाच्या राजकीय केंद्रात झालेला हा प्रवेश पक्षाला नवे बळ देणारा आहे. शारदाताई जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी जनशक्ती आघाडीतून केलेले विकासकाम आता भाजपच्या माध्यमातून आणखी गती घेईल. पक्षात सर्वांना योग्य मानसन्मान मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2047 पर्यंत भारताला महासत्तेच्या दिशेने नेण्याचे ध्येय आहे. कराडमधील दिग्गजांचा प्रवेश हे त्या दिशेने उचललेले पाऊल आहे. भाजप आणि महायुतीच्या माध्यमातून विकासकामांद्वारे या सर्वांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.

आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, जाधव परिवाराने कराडच्या स्टेडियमसाठी जागा देऊन शहराच्या विकासात मोठे योगदान दिले. स्व. जयवंतराव जाधव यांनी ‘लोकमान्य नगराध्यक्ष’ म्हणून पश्चिम महाराष्ट्रात कराडची ओळख निर्माण केली, तर शारदाताई जाधव यांनी दोनदा नगराध्यक्षपद भूषवत सत्तेपेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले. जनशक्ती आघाडीने सदैव सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. आता या सर्वांच्या भाजप प्रवेशामुळे कराडचा राजकीय प्रवास नव्या दिशेने सुरू होईल. या सर्वांचे शहराच्या सर्वांगीण प्रगतीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles